Mon, Mar 2, 2026
राजकीय बातमीपत्र सातारा जिल्हा

नामदार अजितदादा पश्चिम महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व : खासदार नितीनकाका पाटील

नामदार अजितदादा पश्चिम महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व : खासदार नितीनकाका पाटील
Ashok Ithape
  • PublishedAugust 30, 2024

‘किसन वीर’वरील स्वागत समारंभात गौरवोदगार

वाई l दि. ३० : किसन वीर व खंडाळा कारखान्याला थकहमीचे ४६७ कोटी रूपये मिळालेले आहेत. ते फक्त आणि फक्त राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, नामदार अजितदादा पवार व कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्यामुळेच मिळाले आहेत. आतापर्यंत मकरंदआबांनी जी विकासकामे मतदार संघात आणलेली आहेत, त्याला निधी मिळवुन देण्याचे काम अजितदादांनीच केलेले आहे. भविष्याच्यादृष्टीकोनातुन पाहता नामदार अजितदादांच्या पाठीमागे उभे राहणे ही काळाची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक दमदार व धडाकेबाज नेतृत्व म्हणुन नामदार अजितदादांकडे पहावे लागेल, असे गौरवोद्‌गार खासदार नितीनकाका पाटील यांनी काढले.

किसन वीर साखर कारखान्याच्या संचालक मंडळ, विविध संस्था व कामगारांच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर खासदार नितीनकाका पाटील यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार नितीनकाका पाटील पुढे म्हणाले की, खंडाळा व किसन वीर कारखान्याची निवडणुक लढविण्याचा माझा विरोधच होता. दोन्ही कारखान्याची परिस्थिती काय होती हे दिसत होतं. सर्व बँका एनपीएत गेल्या होत्या. त्यामुळे कारखान्याचे लिलाव होणार हे दिसून येत होतं. परंतु त्याचवेळी शेतकरी व कामगारांच्या व्यथा ऐकुण घेवुन भावनेपोटी निवडणुक लढविण्याचा निर्णय मकरंदआबांनी घेतला. त्यावेळी कामगारांनाही सांगितलं होतं की संघर्षाची तयारी ठेवली तरच यश मिळेल. त्यापद्धतीने शेतकरी व कामगारांनी साथ दिली व कारखाना ताब्यात घेतला. ज्यावेळी कारखाना ताब्यात घेतला त्यावेळीच कारखाना कर्जातुन बाहेर काढण्याचे मायक्रो प्लॅनिंग केले होते व त्यानुसारच पुढील पावले टाकत होतो. कारखान्याच्या हितासाठी नामदार अजितदादांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला व त्यांनीही शब्द दिलेला होता. अजितदादा शब्दाला पक्के आहेत, त्यामुळेच त्यांनी हा थकहमीचा प्रस्ताव मंजुर केला.

आमदार मकरंदआबांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच व ताकतीमुळेच आपल्या दोन्ही कारखान्यांची ४६७ कोटींची थकहमी मंजुर होऊन खात्यात वर्ग झालेली आहे. मध्यंतरी वर्तमानपत्रात थकहमीवर स्थगिती आल्याचे वृत्त प्रसिद्ध झालेले होते. ते ऐकुण काहींना आनंद झालेला होता. माझे त्यांना एकच सांगणं आहे की, तुम्हाला आमचा द्वेष आहे, तो तुम्ही राजकारणाच्या माध्यमातुन व्यक्त करा. पण कुणाच्या कुणाच्या अन्नात माती कालवण्याचे पाप करू नका. निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे या जनता त्यावर उत्तर देईलच. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीत असताना पवार साहेबांनी व तदनंतर अजितदादांनी लोकसभा लढविण्याचे संकेत दिलेले होते. परंतु महायुतीतील निर्णयामुळे सातारची जागा राष्ट्रवादीला मित्रपक्षाला द्यावी लागलेली होती. वाईच्या सभेमध्ये अजितदादांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मला खासदार बनविले. आमच्या कुटुंबावर सर्वांनी भरभरून प्रेम केलेले आहे. याचे सर्व श्रेय कोणाला जात असेल तर स्व. तात्यांना सर्वसामान्य जनसामान्यांच्या मनामध्ये तात्यांनी आपले स्थान निर्माण केलेले होते, लोकांना तात्यांकडे जाण्याासाठी वेळेचे बंधन नव्हते. तेच स्थान आज आमदार मकरंदआबांनी निर्माण केलेले आहे. आज जी थकहमीची रक्कम मिळाली ती केवळ आमदार मकरंदआबांच्या ताकतीच्या जोरावरच मिळालेली आहे. खासदारकीच्या माध्यमातून जिल्ह्यासह वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यातील विकासांच्या कामांचा महामेरू वाढविण्याचे काम करण्याचा नक्कीच प्रयत्न माझ्याकडून केला जाणार असल्याची ग्वाहीही यावेळी खासदार नितीनकाका पाटील यांनी दिली.

व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले की, नितीनकाकांना खासदार म्हणून पहायचे आमच्या कार्यकर्त्यांचे खुप वर्षांपासुचे स्वप्न होते. स्व. लक्ष्मणरावतात्यांचीदेखील इच्छा होती. ती इच्छा आज पुर्णत्वास गेलेली असल्यामुळे आज आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद होत आहे. स्व. लक्ष्मणरावतात्यांचे आणि कारखान्याचे भावनिक नांत होतं. सत्तातरांनतरही तात्यांना कायम वाटत होतं की कारखाना चुकीच्या माणसांच्या हातात गेलेला आहे. याचे परिणाम आज आपण सर्वजण भोगत आहे. कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील नामदार अजितदादांबरोबर गेल्यामुळेच महायुतीच्या माध्यमातून आपल्या थकहमीची रक्कम मंजुर होऊन खात्यावर वर्ग झालेली आहे. नितीनकाकांना खासदारकी मिळवुन दिल्याबद्दल तसेच थकहमीची रक्कम मिळाल्याबद्दल महायुतीतील सर्वांचे कारखान्याच्यावतीने आभारी असल्याचे सांगितले. नितीनकाकांनी बँकेच्या माध्यमातुन कधीही पक्षीय वागणुक दिलेली नसुन सर्वसामान्यांचे काम कशाप्रकारे सुकर होईल, यालाच प्राधान्य दिलेले आहे. खासदारकीच्या माध्यमातुनही नितीनकाका विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवतील, याची खात्री मला असून कार्यकर्त्यांनीदेखील कोणाच्या सांगण्यावरून विचलीत न होता आमदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले.

कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, किसन वीरचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील हे कारखान्यावर एक व्हिजन घेऊनच काम करीत आहेत. सकारात्मक बाजुने विचार केल्यामुळेच मला व माझ्या सहकाऱ्यांना काम करण्यात आनंद होतो. सर्वांना सामावुन घेऊन काम करण्याची वृत्ती ही काकांची आहे. कारखान्यातील एखाद्या विषयावर आम्हाला ज्यावेळी काहीच मार्ग निघत नाही. त्यावेळी त्या विषयावर मार्ग काढतात ते नितीनकाका. त्यामुळे जिथे आमची विचार करण्याची क्षमता थांबते, तिथे काकांची विचार करण्याची क्षमता सुरू होत असते. नितीनकाकांच्या माध्यमातुन दिल्ली येथील कारखान्याची कामे सुकर होण्यास मदत होणार असल्याचे सांगुन त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीस संचालक व कामगारांच्यावतीने शुभेच्छा दिल्या. यावेळी खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, संचालक दिलीपबाबा पिसाळ, संदिप चव्हाण, कामगार युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार व साची मंगेश परामणे यांनीही मनोगते व्यक्त केली.

किकली गेटपासून खासदार नितीनकाकांना गजराच्या निनादात मेनगेटपर्यंत आणले. त्यांनतर कारखान्यातील आबासाहेब वीर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मेनगेट ते कार्यक्रम स्थळापर्यंत जेसीबीतुन पुष्पवृष्टी करण्यात आली. औक्षण झाल्यानंतर कार्यक्रमाच्या सुरूवातीला खासदार नितीनकाकांची साखरतुला करण्यात आली. तद्नंतर कारखान्याच्या संचालक मंडळाच्यावतीने, सातारा सहकारी औद्योगिक तोडणी वाहतुक संस्था, कामगार युनियन, किसन वीर पतसंस्था, आबासाहेब वीर पतसंस्था, कामगार कल्याण मंडळ, कारखान्यातील विभागवाईज, कार्यक्षेत्रातील आलेल्या शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांमार्फत सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, तोडणी व वाहतुक सोसायटीचे अध्यक्ष बबनराव साबळे, उपाध्यक्ष अजय कदम, संचालक अरविंद कदम, अॅड. उदयसिंह पिसाळ, महादेव साळुंखे, मानसिंग साबळे, माधवराव डेरे, शिवाजीराव काळे, नानासाहेब कदम, यशवंत जमदाडे, चंद्रकांत फडतरे, शशिकांत भोईटे, शामराव गायकवाड, सुर्यकांत बर्गे, सौ. निर्मला मांढरे, सौ. छाया शिंगटे, मॅनेजर बी. आर. सावंत, कार्यक्षेत्रातील शेतकरी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

आमदार मकरंदआबांनी ६० टक्के कारखाना वाचविला उर्वरित वाचविण्याचे काम तुमचे खासदार नितीनकाका पाटील*
शेतकऱ्यांचे २०२०-२१ मधील देय्य ऊस बील, कामगारांच्या पीएफची रक्कम, उर्वरित पगार ही सर्व देणी देणार असून सर्व टप्प्याटप्यांनी देणार असल्याचे सांगितले. सर्व बँकांची सेटलमेंटप्रमाणे देणी देणार आहे. कामगारांचे अभिनंदन करायला हवे कारण २५-३० महिने पगाराविना काम करणे किती जिकीरीचे आहे ते न बोललेलं चांगलं. त्यामुळे कोणाचेही पैसे बुडणार नाही, याची खात्री बाळगावी. ऊस उत्पादक सभासदांनाही एवढेच सांगणे आहे की, आमदार मकरंदआबांनी थकहमीचे पैसे आणुन ६० टक्के कारखाना वाचविला आहे. उर्वरित ४० टक्के वाचविण्याचे काम आपले आहे. दोन्ही कारखाने ऊसाच्या दरामध्ये मागे पडणार नसल्याने आपला पिकविलेला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालण्याचे आवाहनही केलेले आहे

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!