सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप हा एक सेतू : महेश अय्यंगार सहसंचालक पत्र सूचना कार्यालय
पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्रात सांगली येथे एक दिवसीय माध्यम कार्यशाळेचे आयोजन
सांगली, 20 ऑगस्ट 2024
जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप ही ग्रामीण माध्यम परिषद हा एखाद्या सेतूप्रमाणे कार्य करतो असे पत्र सूचना कार्यालय पुणे चे सहसंचालक महेश अय्यंगार यांनी सांगितले. पी आय बी च्या मुंबई कार्यालयाच्यावतीने सांगली येथे आयोजित केलेल्या ‘वार्तालाप’ या माध्यम कार्यशाळेत ते आज बोलत होते.
समाज माध्यमांच्या उदयानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन आले असून खोट्या आणि सनसनाटी वृत्तांचे वाढते प्रमाण बघता सरकारी माध्यमांची भूमिका अधिकच महत्वपूर्ण झाली आहे, असे महेश अय्यंगार यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. “फेक अर्थात खोट्या बातम्यांचा एक नवीन कल अतिशय गंभीर स्वरूप धारण करत आहे आणि खोट्या बातम्या उघडकीस आणण्यात, तथ्य समोर मांडण्यात सरकार एक चांगला भागीदार असू शकते” असे ते म्हणाले. खोट्या आणि तथ्यहीन बातम्यांपासून जनसामान्यांचे रक्षण करण्यासाठी दक्षतेला अनन्यसाधारण महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
खाद्यान्नविषयक तंत्रज्ञान, कीटक व्यवस्थापन अशा क्षेत्रात कार्यरतसंशोधन संस्था आणि पत्रकार यांच्यात संवाद साधण्यासाठी वार्तालाप यासारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सांगलीच्या निवासी जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले.
त्यानंतर या कार्यक्रमात, अणुऊर्जा विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बी बी मिश्रा यांनी परस्परसंवादीसत्रात बियाण्यांचा विकास, अन्न साठवणूक आणि कचरा व्यवस्थापन याविषयांमध्ये सध्या उपलब्ध असलेले नवीन तंत्रज्ञान देशातील शेतकऱ्यांनी आत्मसात करावे यासाठी अणुऊर्जा विभागाने तयार केलेल्या विविध संशोधनाची माहिती दिली. अणुऊर्जा विभागाच्या उपक्रमांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया BARC संकेतस्थळ आणि संकेतस्थळाच्या च्या उद्योजक कॉर्नर विभागाला भेट द्या.
सांगली जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी कृषी वित्त क्षेत्रामधील बँकिंग क्षेत्राच्या भूमिकेविषयी सादरीकरण केले.
त्यानंतर प्रादेशिक स्तरावरील मध्यवर्ती एकात्मिक कीटक व्यवस्थापन केंद्राचे संशोधक अमित जाधव यांनी कीटकनाशकांच्या अतिवापराचे धोके आणि पर्यावरणीय संवेदनशीलतेच्या अनुषंगाने विकसित तंत्रज्ञानाच्या आधारे कीटक व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण केले.
समारोपाच्या सत्रात शेतकरी उत्पादक संस्थेचे संदिप खुडे यांनी भारत सरकारकडून मिळालेल्या आर्थिक मदतीचा आपला अनुभव विषद केला.
त्यानंतर पत्र सूचना कार्यालय पुणे चे सहसंचालक महेश अय्यंगार आणि सेन्ट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन ,कोल्हापूरचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी महेश चोपडे यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या कामकाजाचे स्वरूप, पीआयबीच्या संकेत स्थळाचा पत्रकारांना अधिक सक्षमपणे कसा उपयोग करता येईल त्याबरोबरच पत्रकार कल्याण योजना आदींबद्दल माहिती दिली.
ही सादरीकरणे आणि चर्चांनंतर उपस्थित वार्ताहरांसोबत झालेल्या परिषदेत, आज झालेल्या सादरीकरण आणि चर्चांसंबंधीच्या सूचना आणि सर्वंकष अभिप्रायही घेतला गेला. या माध्यम कार्यशाळेत सांगलीमधील सुमारे 80 वार्ताहरांनी सक्रिय सहभाग नोंदवला.














