Mon, Mar 2, 2026
अभिष्टचिंतन

आधुनिक सावित्री – सौ. स्वाती बिरामणे

आधुनिक सावित्री – सौ. स्वाती बिरामणे
Ashok Ithape
  • PublishedAugust 18, 2024

पाचगणी परिसरातील महिलांना शिक्षणाचा व स्थैर्याचा मार्ग दाखवणाऱ्या इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी सौ. स्वाती महेश बिरामणे यांचा शुक्रवार, दि. 16 ऑगस्ट रोजी वाढदिवस संपन्न झाला. विद्यानिकेतन हायस्कूलच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार- प्रचार व महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या या आधुनिक सावित्रीच्या कार्याचा वाढदिवसानिमित्त आढावा….

पाचगणी – महाबळेश्वर हा परिसर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगभरातून या निसर्गसंपन्न गिरीनगरीत मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. बाजारपेठ पर्यटनावर अवलंबून असली तरी स्थानिक महिलांना शिक्षण आणि आर्थिक स्थैर्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी स्वातीताई उत्साहाने पुढे आल्या. या परिसरातील महिलांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते, त्याची सखोल माहिती असल्याने या अडचणींवर मात करण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करावी हा विचार एक स्त्री म्हणून त्यांच्या मनात आला त्यातून महिला सक्षमीकरण आणि महिला शिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी सखोल प्रयत्न केले. केवळ शिक्षणच नव्हे तर समाजात वावरताना येणाऱ्या विविध प्रश्नांवर मात करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केले त्यातून अनेक महिलांना नेमके आणि नेटके मार्गदर्शन मिळाले व स्वयंसिद्ध होण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू झाली. एक महिलाच इतर महिलांच्या दुःखाची जाणीव ठेवू शकते व आत्मीयतेने त्याचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करू शकते याचे बोलके उदाहरण म्हणजे स्वातीताई आहेत.

स्त्री म्हणजे विधात्याच्या सृजनाचं मूर्तीमंत प्रतिक. या प्रतिकात सामावलेल्या शक्तीचा अंदाज घेणे कधी कधी त्या विधात्याला देखील अवघड होऊन जातं. काय आहे स्त्रीची शक्ती? …… कणखर असणं? तिची अफाट कार्यक्षमता? एकाच वेळी अनेक गोष्टी लीलया करू शकण्याची ताकत? का तिचं हळुवार असणं?….एका स्त्रीमध्ये या सगळ्या गुणांची ताकद स्वातीताईंच्या रूपाने दिसून येते. पांचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रावर विद्यानिकेतन हायस्कूलच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या भूमिकन्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार पुढे नेण्याचे काम त्या प्रामाणिकपणे करीत आहेत.

महाबळेश्वर तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचा विडा त्यांनी उचला आहे. ‘ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या श्री स्वामी समर्थांच्या मंत्रानुसार त्या समाजसेवेच्या मार्गावर चालत असतात. परिसरातील महिलांचे सामाजिक प्रबोधन करत असताना त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्या हिरहिरीने पुढे जात असतात. मुलांचे शिक्षण व त्यांचे आरोग्य, महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार यांविषयी त्या कायदेविषयक ज्ञान देतात. अनेक गरीब, गरजू व होतकरू मुलांना आपल्या शाळेतून मोफत शिक्षण देण्याचा त्यांनी संकल्प ठेवला आहे. यातून काही मुले शिक्षणही घेत आहेत. मात्र कधीही प्रसिद्धीच्या झोतात न राहता सतत काम, काम आणि फक्त कामच करायचं हा विचार त्या नेहमी करतात. महाबळेश्वर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी अनेक समाजाभिमुख कामे केली. आपल्या पदांच्या माध्यमातून आपल्या सभोवतालचा समाज संघटित व्हावा आणि त्यांच्या रोजच्या गरजा भागवाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या माध्यमातून वृद्धाश्रमांना त्यांनी अनेकदा मदत केली आहे. तर मध्यंतरी पूरग्रस्तांना कपडे व धान्य वाटप केले आहे. शाळेतील सर्व मुले ही आपल्या एकाच छताखाली असल्याने आपले कुटुंब समजूनच स्वातीताई आपली सेवा बजावताना दिसतात.

कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र हाहाकार माजला असताना व अख्ख जग संकटात सापडले असताना स्वातीताई मात्र शांत बसल्या नाहीत. त्यांनी कोरोना काळात गरजूंना औषधे वाटली. त्यानंतरही आवश्यकता असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीतील व्यक्तींना औषधे आणि जीवनावश्यक वस्तू त्या सातत्याने देत असतात. सामाजिक व शैक्षणिक कार्यात विद्या निकेतनचे संस्थापक आनंदराव बिरामणे यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभते.

बोलण्यातला स्पष्टपणा व कार्य करून दाखवण्यातला कर्तृत्वपणा असे खंबीर गुण म्हणजे स्वातीताई म्हणाव्या लागतील. विचारांची प्रगल्भता, मनाचा मोठेपणा, वक्तशीर आणि काटेकोर अशा गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांचे समाजातील स्थान निश्चितच आदराचे आहे. त्यांनी मांडलेल्या मुद्देसूद विचारांनी समोरच्या व्यक्तीवर पडलेली छाप या गुणांचा अभिमान वाटतो. सकारात्मक विचार अन् स्वतः वर असलेल्या विश्वासाने त्यांनी सर्वांची मने जिंकली आणि एक पाठोपाठ एक स्वप्न साकार केली आहेत.

प्रत्येक स्त्रीने स्वतःची ओळख घडवायला हवी, महिलांनी आता स्वतःच खंबीरपणे लढा उभारला पाहिजे. महिला नेहमी दुसऱ्याचा विचार करतात. तसा स्वतःचाही विचार करायला पाहिजे व महिलांमध्ये धाडस असले पाहिजे. साधी गृहिणीसुद्धा ध्येय ठवल्यास मोठे कर्तृत्व करू शकते ही संकल्पना स्वातीताई यांनी समाजास दाखवून दिली आहे.

सकारात्मक विचार अन् स्वतः वर असलेल्या विश्वासाने त्यांनी सर्वांची मने जिंकली आणि एका पाठोपाठ एक स्वप्न साकार केली आहेत. अशा वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाचा त्रिवेणी संगम असणाऱ्या स्वातीताई बिरामणे यांना संकल्प न्यूज माध्यम समूहाकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!