Mon, Mar 2, 2026
अध्यात्म

प्राज्ञपाठशाळेचा दृष्टिकोन पुरोगामी विचारांचा – डॉ.श्रीपाल सबनीस

प्राज्ञपाठशाळेचा दृष्टिकोन पुरोगामी विचारांचा – डॉ.श्रीपाल सबनीस
Ashok Ithape
  • PublishedAugust 9, 2024

वाई l प्रतिनिधी :

सातारा-धर्म परिवर्तनशील आहे. वेदांत अस्पृश्यतेला व जातिव्यवस्थेला थारा नाही. या दोन सूत्रांची अभिव्यक्ती स्वामी केवलानंद सरस्वती यांनी केली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी हेच सत्य लेखनात व भाषणात मांडले. यातून प्राज्ञपाठशाळा मंडळाचा पुरोगामी विचारांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

डॉ. सबनीस यांनी वाई येथील प्राज्ञपाठशाळा मंडळास भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. त्यांची या संस्थेस पहिलीच भेट होती. त्यांनी केवलानंद सरस्वती यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण केला. सचिव अनिल जोशी यांनी त्यांचे स्वागत केले.

डॉ. सबनीस म्हणाले, केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या इमारतीत आल्यानंतर मी संपूर्णतः विचाराने बदलून गेलो. येथील सर्व इतिहासाची माहिती घेतल्यानंतर स्वतः धन्य झालो. ही संस्था स्वतः ज्ञाननिर्मितीचे कार्य करीत असून, संस्थेने हजारों संस्कृत हस्तलिखित पोथ्यांचे जतन केले आहे. नवभारत आणि ‘धर्मकोश’ अशा मानदंडात्मक कार्याने ही संस्था वेगळेपण जपते पुजते आहे. याचा मनस्वी आनंद झाला.

सनातन्यांपासून व उथळ कर्मठ मंडळीपासून पुरेसे सुरक्षित अंतर राखून आपली ज्ञान-विज्ञान परंपरा सातत्याने व निष्ठेने ही जपते आहे, हा भाग नोंद घेण्यासारखा असल्याचेही श्री. सबनीस म्हणाले
यावेळी सहसचिव भालचंद्र मोने, संचालक नंद‌कुमार बागवडे राजेंद्र प्रभुणे व कर्मचारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!