मर्यादा मोडणाऱ्या डॉल्बीमालकांसह आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
![]()
वाईच्या उत्कर्ष पतसंस्थेतर्फे पोलिसांना निवेदन सादर.
वाई / प्रतिनिधी:
विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवेळी वाजवण्यात येणाऱ्या डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यास डॉल्बी मालक, चालक यांच्यासह संबंधित कार्यक्रमांच्या आयोजकांवरही कारवाई करावी व रीतसर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे जाहीर निवेदन येथील उत्कर्ष सहकारी पतसंस्थेतर्फे वाई पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉल्बीच्या उच्च आवाजामुळे आसपासच्या नागरिकांना त्रास होत आहे आणि यामुळे ध्वनी प्रदूषण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर डॉल्बीमालक, चालक यांनी कमाल आवाजाची मर्यादा पाळणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून सक्तीने कारवाई होण्यापूर्वीच डॉल्बी वापरणाऱ्या सर्व मालकांनी आणि आयोजकांनी याबाबत सतर्क राहून नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. तसेच, डॉल्बी सिस्टिमचा वापर करणाऱ्या आयोजकांनी आणि मालकांनी स्थानिक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
त्यांची नियमांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि कोणतेही उल्लंघन टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक सक्तीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दिनांक १० मे २०२४ रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाई शहरात डॉल्बीच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये जवळपास चार ते पाच डॉल्बी पथकांमध्ये आवाजाची चुरस लागल्याने संपूर्ण वाई शहर आणि परिसर दणाणून गेले होते. त्यातून वाई शहर व परिसरातील वयोवृद्ध व लहान बालके तसेच आजारी रुग्णांचा काळजाचा थरकाप उडाला होता.
वाई शहराच्या प्रत्येक आळीत रुग्णालये आहेत, याचे भान डॉल्बी मालक, चालक व आयोजकांना राहिले नाही. यामुळे अनेक गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. आवाजाची डेसिबल मर्यादा ओलांडल्याने वाईतील समस्त नागरिक त्रस्त झालेले होते व त्यामुळे याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. आणि याचसाठी पुढाकार घेऊन उत्कर्ष पतसंस्थेने मा. न्यायालयाने नेमून दिलेल्या कायदेशीर नियमावली प्रमाणे डेसिबलनुसार डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ठेवली नाही तर उल्लंघन करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात यावी ,असे निवेदन उत्कर्ष पतसंस्थेच्या पुढाकाराने वाई पोलीस स्टेशन वाई यांना देण्यात आले.
उत्कर्ष पतसंस्थेच्या या मागणीस सर्वांगी प्रतिष्ठान, वाई व्यापारी संघ, सराफ असोशिएशन, सोनार समाज, अखिल भारतीय पंचायत ज्येष्ठ नागरिक संघ, टिळक स्मारक संस्था व अनेक वाईकर नागरिकांनी पाठींबा दिला आहे.













