Mon, Mar 2, 2026
सहकार

‘किसन वीर’कडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाण्याचा टँकर

‘किसन वीर’कडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी पाण्याचा टँकर
Ashok Ithape
  • PublishedJuly 4, 2024

भुईंज, दि.४ : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, या उदात्त हेतुने किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष वाई-खंडाळा – महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार मकरंद (आबा) पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवार्थ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पुजन किसन वीर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करून तो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आला.

यावेळी प्रमोद शिंदे म्हणाले की, आळंदीहुन निघालेल्या या वारीमध्ये सर्व स्तरातुन वारकरी सहभागी होत असतात. पंढरीच्या वारीमध्ये फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सिम भक्तीचे दर्शन होत असते. हरीमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा प्रवास पायी करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात. या वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवु नये, याकरिता किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखाना व्यवस्थापनाने वारकऱ्यांच्या सेवेकरिता मागील दोन वर्षांपासून कारखान्यामार्फत पाण्याचा टँकर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.

कार्यक्रमास कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, विलासराव बाबर, कार्यालयीन अधिक्षक उमेश अंबिके, वित्त अधिकारी मधुकर जाधव, केन मॅनेजर शंकरराव कदम, मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, ईडीपी मॅनेजर आर. जे. सणस, परचेस ऑफिसर संतोष जगताप, राजेंद्र जगताप, नितीन निकम, तोडणी वाहतुक संस्थेचे मॅनेजर बी. आर. सांवत यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!