![]()
विनोद कुलकर्णी, शिवराम थोरवे, लो. टिळक संस्थेला पुरस्कार जाहीर, भद्रेश भाटे, जयवंत पिसाळ यांचा विशेष सन्मान
वाई : साप्ताहिक कृष्णातीरच्या वतीने यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. २३ रोजी होणार असून यंदाच्या वर्षी अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त विनोद कुलकर्णी, टी अँड टी कंपनीचे चेअरमन उद्योजक शिवराम थोरवे आणि वाई येथील लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक संस्था यांना गौरवण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार भद्रेश भाटे व जयवंत पिसाळ यांचा विशेष सन्मान होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कृष्णातिरचे संपादक कृष्णात घाडगे म्हणाले, निवृत्त सनदी अधिकारी सुबराव पाटील आणि पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांच्या हस्ते होणारा हा सोहळा यंदाच्या २३ व्या वर्धापन दिनी वाईच्या लोकमान्य टिळक संस्थेच्या कै. रमेश गरवारे सभागृहात रविवारी सायंकाळी ४ वाजता संपन्न होत आहे.
पत्रकारिता क्षेत्रात गेली २५ वर्ष अव्याहतपणे काम करताना विनोद कुलकर्णी यांनी सहकार क्षेत्रासह साहित्य क्षेत्रात अनमोल योगदान दिले आहे. त्या कामाच्या बळावर त्यांची अखिल भरतील मराठी साहित्य महामंडळावर निवड झाली. त्याबद्दल आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
मूळ वाई तालुक्यातील धरणग्रस्त कुटुंबातील शिवराम थोरवे यांनी आपले संपूर्ण शिक्षण याच परिसरात घेऊन उद्योग क्षेत्रात उमठेलेला ठसा अनेकांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. त्याच अभिमानाने त्यांना आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
लोकमान्य टिळक स्मारक संस्था आता शतकाकडे वाटचाल करत आहे. ही संस्था केवळ वाई शहराचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात अनमोल योगदान देतानाच व्याख्यानमालेसह विविध उपक्रमांद्वारे समाजशिक्षण व प्रबोधनाचे मोठे काम संस्था करत आहे. त्या कामाचा गौरव आदर्श संस्था पुरस्काराद्वारे केला जात आहे.
तसेच वाई तालुक्याच्या पत्रकारिता क्षेत्रात समाजाभिमुख पत्रकारितेचा आदर्श निर्माण करणारे जेष्ठ पत्रकार भद्रेश भाटे व जयवंत पिसाळ यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासह आयोजित स्नेहमेळाव्यास विविध मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृष्णात घाडगे यांनी केले आहे.













