ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या ऊसाइतकेच खोडवा पिकाला महत्व देणे अत्यंत गरजेचे – डॉ.धर्मेंद्रकुमार फाळके
![]()
ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या ऊसाइतकेच खोडवा पिकाला महत्व देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन माती व पाणी चिकित्सालय, कृषी महाविद्यालय पुणे येथील व्यवस्थापक डॉ.धर्मेंद्रकुमार फाळके यांनी केले.
भुईंज : पत्रकार महेंद्रआबा जाधवराव.
शाहूनगर शेंद्रे येथील अजिंक्यतारा सह. साखर कारखाना कार्यक्षेत्रातील वळसे येथील शेतकरी मोहन कदम यांच्या को व्ही एस आय 18121 खोडवा ऊस प्लॉटची पहाणी डॉ. फाळके यांनी केली व खोडवा ऊस पिकासंदर्भातील कारखाना व्यवस्थापन व शेती आणि ऊस विभागाचे कौतुक केले.
यावेळी कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, मुख्य शेती अधिकारी विलास पाटील, डेप्युटी शेती अधिकारी लालशिंग शिंदे,ऊस विकास विभागाचे ॲग्री ओव्हरसिअर प्रसाद सावंत, कामगार युनियनचे सदस्य व ॲग्री ओव्हरसिअर सचिन जाधव तसेच शेती व ऊस विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पीक आहे. या पिकामुळे महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होण्यास मदत झाली आहे. दरवर्षी राज्यातील ऊसाखालील क्षेत्र १० लाख हेक्टर च्या दरम्यान असते. परंतु दिवसेंदिवस ऊसाखालील वाढत्या क्षेत्राच्या मानाने उत्पादकता वाढण्याचे चित्र मात्र दिसत नाही. महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणांपैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे एक प्रमुख कारण आहे. राज्यातील एकूण ऊसाखालील क्षेत्रापैकी ४० ते ४५ टक्के खोडव्याचे क्षेत्र असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा मात्र ३० ते ३५ टक्के इतकाच आहे. खोडवा पिकाची जोपासना आधूनिक संवर्धीत तंत्रज्ञानाने केल्यास हवामान बदलाच्या परिस्थितीतही खोडवा ऊसाचे उत्पादन कमी खर्चात लागणीच्या ऊसाएवढे किंबहुना त्यापेक्षाही जास्त येऊ शकते असे संशोधनावरून सिद्ध झाल्याचे डॉ. फाळके यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ऊस तोडणीनंतर ऊसाच्या शेतामध्ये भरपूर पाचट पडलेले असते. पाचटाचे महत्व ऊस उत्पादकांना न कळल्याने बहुतांशी शेतकरी पाचट पेटवून देतात व त्यामुळे पाचटाच्या रूपाने उपलब्ध असणाऱ्या अत्यंत मौल्यवान अशा सेंद्रिय पदार्थांची व अन्नद्रव्यांची अक्षरशः नासाडी करतात. पाचट हा ऊस शेतीमध्ये मोफत मिळणारा अत्यंत महत्वाचा सेंद्रिय पदार्थ आहे. महाराष्ट्रात जवळजवळ ४० ते ४५ टक्के क्षेत्रावर घेतल्या जाणा-या खोडव्यापैकी पाचटाचा वापर शास्त्रीय पध्दतीने मात्र १० टक्के क्षेत्रावरही होताना दिसत नाही. असे पाचट जाळल्यामुळे कित्येक टन नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि बहुमुल्य सेंद्रिय पदार्थांचा आपण नाश करीत असतो. हि अन्नद्रव्ये रासायनिक खतांच्या व सेंद्रिय खतांच्या माध्यमातून भरून काढण्यासाठी खूप मोठया प्रमाणावर खर्च करावा लागतो. म्हणूनच हे थांबविण्यासाठी पाडेगांव येथे खोडवा ऊसामध्ये शेतातच निसर्गतः उपलब्ध असणाऱ्या मुलस्थानी पाचटाचा आच्छादन म्हणून वापर करण्याचे बहुगुणी तंत्र विकसीत करण्यात आले. या नवीन संवर्धीत ऊस खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञानामध्ये शून्य मशागत, जैविक व सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन, रासायनिक खतांचा प्रभावीपणे वापर, मूलस्थानी पाचटाचा आच्छादनासाठी पुर्नवापर या मुलभूत तंत्रांचा अंतर्भाव असल्याचे डॉ. फाळके यांनी स्पष्ट केले.
अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते म्हणाले, अजिंक्य उद्योग समूहाचे मार्गदर्शक आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व संचालक मंडळाचे मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांचे हित जोपसण्याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते. शेती व ऊस विभागाच्या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी विविध विषयावर मार्गदर्शन शिबाराचे सातत्याने आयोजन केले जात असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, लागण ऊसाप्रमाणे खोडवा पिकासाठी पूर्व मशागत करावी लागत नसल्याने जमिनीतील पूर्व मशागतीवरील खर्च वाचतो. त्यामुळे साधारणपणे एकरी रु. ८००० ते १०००० खर्चाची बचत होते. पूर्व मशागतीवरील खर्चाबरोबरच शेताच्या तयारीसाठी लागणारा वेळ आणि श्रमांची बचत होते. यासाठी शेतकऱ्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने खोडवा उसाची काळजी घावी. असे केल्यास एकरी उत्पनात वाढ तर होतेच शिवाय निडवा उसासाठीही फार मोठा फायदा होतो.
खोडवा पीक घेतांना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करताना मुख्य शेती अधिकारी विलास पाटील म्हणाले, ऊसाची तोडणी ऑक्टोबर पासून एप्रिल-मे पर्यंत केली जाते. या ऊसाचा खोडवा ठेवला जातो. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो, तसतसे खोडव्याचे उत्पादन कमी होत जाते. म्हणून १५ फेब्रुवारीनंतर तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवू नये. ऑक्टोंबर-नोव्हेंबर या कालावधीत तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते. तसेच आडसाली, पूर्वहंगामी व सुरू या हंगामातील तुटलेल्या ऊसाच्या खोडव्यापेक्षा पूर्वहंगामी ऊसापासून ठेवलेल्या खोडव्याचे अधिक उत्पादन मिळते.













