Tue, Mar 3, 2026
सामाजिक

सामाजिक बांधिलकी जपणारा वाईचा रोटरी क्लब

सामाजिक बांधिलकी जपणारा वाईचा रोटरी क्लब
Ashok Ithape
  • PublishedJune 7, 2024

सुवर्ण महोत्सवानिमित्त शनिवारी वाईमध्ये विशेष सोहळा, सोमवारी नामवंतांची संगीत मैफल

वाई / प्रतिनिधी

‘आपण समाजाचं काही देणं लागतो’ ह्या भावनेतून स्वार्थविरहित समाजसेवा करणा-या, यशस्वी व्यावसायिकांची रोटरी ही एक आंतरराष्ट्रीय संस्था. रोटरी क्लब ऑफ वाई इंटरनॅशनल या संस्थेतर्फे क्लबच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शनिवार,दि. ९ जून रोजी विशेष कार्यक्रमाचे वाईमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन डिस्ट्रिक्ट गवर्नर स्वाती हेळकर व सहकाऱ्यांनी केले आहे.

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या संस्थेच्या इतिहासाविषयी जाणून घेता, जगातील दोनशेहून अधिक देशातले, ‘समाजभान’ असलेले, असे व्यावसायिक एकत्र आले आणि जगभरात बत्तीस हजारहून अधिक रोटरी क्लब्सची स्थापना झाली..
ही सामाजिक चळवळ, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या वाई शहरात रुजली आणि पाच दशकांपूर्वी, १० जून १९७४ रोजी रोटरी क्लबचे रोप लावले गेले.. ‘निस्वार्थी सेवा’ हे आपलं ब्रीदवाक्य सार्थ ठरवत गेल्या पन्नास वर्षात, रोटरी क्लब ऑफ वाईने साक्षरता, महिला सबलीकरण, पर्यावरण, महिला आणि बाल स्वास्थ्य, पोलिओ आणि रोग प्रतिबंध, आर्थिक सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रात सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत.
आजवर या क्लबच्या माध्यमातून वाई तालुक्यात ८ मिनी सायन्स सेंटर्स ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी संशोधक घडले आहेत.

तसेच न्यू इंग्लिश स्कूल, सातारा इथं सायन्स लॅब्ज आणि डिजिटल क्लासरूम स्थापन करण्यात आल्या आहेत.
ओहोळी येथे मोठा पाणीपुरवठा प्रकल्प कोविड काळामध्ये शेळी पालन प्रकल्प उभारणीच्या बरोबरीनेच सातारा जिल्ह्यात १५ आरोग्य सुविधा केंद्रे, दुर्गम भागात सौर दिवे, महिलांना शिलाई मशिन वितरणाचे कार्यही क्लबच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

शेकडो डिजिटल क्लासरूम्स आणि 1500 शैक्षणिक टॅब्ज आणि 26 हॅप्पी स्कूल्स देणाऱ्या क्लबच्या माध्यमातून साताऱ्यातील
माऊली ब्लड बँकेचे अत्याधुनिकीकरण पूर्ण झाले आहे.
याशिवाय शालेय मुलींना सायकल वितरण, दुर्गादेवी स्कॉलरशिप, शेतकरी बांधवांसाठी अवजार बँक, सेंद्रिय खत निर्मितीसाठी १०२० कुट्ंबांसमवेत कार्य करीत क्लबने समाजकार्याचा वसा आणि वारसा जपला आहे.

कॅन्सर स्क्रीनिंग आणि अवेरनेस साठी रोटरी आशा एक्सप्रेस असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प क्लबने राबवले आहेत. गेल्या महिन्यातच कराडच्या कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात रोटरी अशा एक्सप्रेस या अत्याधुनिक ॲम्बुलन्सचे अनावरण करण्यात आले आहे. त्या माध्यमातून कॅन्सर जनजागृती, चिकित्सा, निदान व उपचार याबाबत विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत.
अभिमानाची आणि कौतुकाची बाब म्हणजे क्लबच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी, रोटरीयन स्वाती हेरकळ ह्या ‘डिस्ट्रिक्ट गव्हर्नर’ ह्या पदावर विराजमान आहेत. ह्या महत्वाच्या पदाची जबाबदारी त्या अतिशय सक्षमतेने पार पाडत आहेत.

दि. ९ जून २०२४ रोजी डिस्ट्रिक्ट ग्रँटच्या माध्यमातून एका मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन माजी रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर आणि द रोटरी फाऊंडेशन व्हाइस चेअरमन डॉ. भरत पांड्या यांच्या हस्ते होणार आहे. या डिस्ट्रिक्ट ग्रँट मधून, २०० कमर्शियल आटा चक्कीचे वितरण गरजू एकल महिलांना करून प्रांत ३१३२ मधील २०० महिलांना सक्षम करण्यात येणार आहे.

डिस्ट्रिक्ट गवर्नर स्वाती हेरकळ यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून या महिलांना सक्षम करण्यात येत आहे. या महिलांना त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करून त्यांच्या जीवनामध्ये एक नवा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता यावी या दृष्टीने हे प्रयत्न करण्यात येत आहेत, याच दिवशी रोटरी क्लब ऑफ वाईच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ग्लोबल ग्रांटच्या माध्यमातून नुकतीच कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कराड यांना देण्यात आलेली कॅन्सर स्क्रीनिंग बस कॅम्पसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

अविरत मानवसेवेची पन्नास वर्ष पूर्ण करत, रोटरी क्लब ऑफ वाई, येत्या १० जून रोजी ‘सुवर्ण महोत्सव’ सोहळा साजरा करत आहे. रविवार दि. ९ जून रोजी सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा, वाई येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणाऱ्या ह्या सोहळ्याला ‘डिस्ट्रिक्ट गवर्नर’ स्वाती हेरकळ आणि द रोटरी फाऊंडेशन व्हाईस चेअर अँड ट्रस्टी पास्ट रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ. भरत पंड्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत.

तसेच सोमवार दि. १० जून रोजी, रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे ‘रोटरी स्वरसंध्या – म्युझिकल नाईट’, हा धमाल हिंदी आणि मराठी गीतांचा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ख्यातनाम गायक हृषिकेश रानडे, डॉ. राधा हृदयनाथ मंगेशकर, सागर वैराट अशा गायकांची मांदियाळी असलेला हा कार्यक्रम १० जून रोजी, संध्याकाळी ८ वाजता न्यू चित्रा टॉकीज, गणपती आळी इथे संपन्न होणार आहे.

डिस्ट्रिक्ट गवर्नर स्वाती हेरकळ करत असलेल्या अशा अनेक प्रकल्पांमधून समाजाला एक नवीन दिशा मिळत आहे. यासाठी रो. प्रमोद शिंदे, रो. सुनिल शिंदे, सोनाली शिंदे आणि रो. दिपक बागडे यांनी मोलाचे सहकारी केले आहे.

सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ह्या दोन्ही कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!