भुईंजच्या सरस्वती ॲकॅडमीचे बारावीच्या परीक्षेत उज्वल यश ; तन्वी इथापेने संपादन केला प्रथम क्रमांक
![]()
पहिल्या पाच गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींचाच समावेश. ४८ विद्यार्थ्यांनी पटकावला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन शेरा
वाई / प्रतिनिधी : येथील सरस्वती ॲकॅडमीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या उज्वल यश संपादन केले आहे. तन्वी इथापे या विद्यार्थिनीने ८७.३३ टक्के गुण मिळवत ॲकॅडमीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर सानिका तरडे, सई इथापे, सृष्टी भोसले, स्वप्नाली फरांदे, सृष्टी शिंदे या विद्यार्थिनींनी अनुक्रमे द्वितीय ते पंचम क्रमांक मिळवले आहेत.
अकॅडमीमध्ये पहिले पाच क्रमांक विद्यार्थिनींनीच संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या निकालानंतर स्पर्धात्मक युगातील करिअर घडविण्याचा खरा प्रवास सुरू होतो. त्यामुळेच उत्तम तयारी करत परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक गुण मिळविण्याची चढाओढ दिसून येते. नुकत्याच जाहीर झालेल्या १२ वी परीक्षेच्या निकालात भुईंज येथील सरस्वती अकॅडमीच्या १५ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत, तर ७० ते ८० टक्क्यांपर्यंत गुण मिळविणाऱ्या या अकॅडमीतील विद्यार्थ्यांची संख्या ३३ इतकी आहे. सरस्वती अकॅडमीच्या ४८ विद्यार्थ्यांनी फस्ट क्लास विथ डिस्टिंक्शन शेरा मिळवला आहे. १३ विद्यार्थ्यांनी फस्टक्लास तर १० विद्यार्थ्यांनी सेकंड क्लास मिळविला आहे.
यंदाच्या १२ वीच्या बोर्ड परीक्षा निकालात अकॅडमीच्या ७३ विद्यार्थ्यांनी मिळविलेले घवघवीत यश हे त्यांनी यशस्वी करिअरकडे घेतलेली गरूडझेप आहे, अशी प्रतिक्रिया सरस्वती ॲकॅडमीच्या संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दीपिका सूर्यवंशी यांनी व्यक्त करीत गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वप्नांचा वेध घेतांना प्रयत्नांची पराकष्टा करण्यात आमचे विद्यार्थी सतत पुढे असतात, त्यासाठी आमचे शिक्षक सातत्याने दर्जेदार अध्यापन करतात. विद्यार्थ्यांचे परिश्रम, विभागप्रमुख प्रा. जितेंद्र भिलारे यांचे उत्तम नियोजन व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी यांची साथ यांची एकत्रित गोळाबेरीज म्हणजेच सरस्वती अकॅडमीच्या यशाची उंचावत जाणारी कमान असल्याचे सांगून प्रा. राहुल माने यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
सरस्वती अकॅडमीतील विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद ॲकॅडमीत जोरदारपणे साजरा होत असताना समाजातील विविध स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रा. धनाजी घाडगे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.













