हरिनामाच्या गजराबरोबरच कृषी जनजागृतीचे फलकही ; देगावमध्ये पारायण सोहळ्याच्या बरोबरीनेच शेतकरी मार्गदर्शनाचा उपक्रमही उत्साहात
![]()
अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून देगाव (ता. वाई) येथे वारकरी संप्रदायातील अध्यात्मिक कार्यक्रमांंबरोबरच कृषी जनजागृती उपक्रम राबविण्यात येऊन अध्यात्म आणि कृषी कल्याण कार्यक्रम संयुक्तरीत्या साजरा करण्यात आला.
वाई / प्रतिनिधी :
अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून देगाव (ता. वाई) येथे वारकरी संप्रदायातील अध्यात्मिक कार्यक्रमांंबरोबरच कृषी जनजागृती उपक्रम राबविण्यात येऊन अध्यात्म आणि कृषी कल्याण कार्यक्रम संयुक्तरीत्या साजरा करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, देगाव येथे सलग 19 व्या वर्षी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. देवाची आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ह. भ. प. ज्योतीताई मतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारायण काळात ग्रंथवाचन, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, जागर आदी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सप्ताहाच्या समाप्ती निमित्ताने गावातून “राम कृष्ण हरी”च्या निनादात दिंडीही काढण्यात आली. त्या बरोबरीनेच कृषी खात्याच्या सहकार्याने खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकरी जनजागृती उपक्रम करणाऱ्या दिंडीचेही नियोजन करण्यात आले होते. टाळ मृदंगाच्या गजरात राम कृष्ण हरी चा निनाद होत असतानाच शेतकऱ्यांचा गुणगौरव करणाऱ्या व शेतकरी जनजागृती पर घोषणांनीही परिसर दणाणून गेला होता.
सामूहिक बियाणे उगम क्षमता चाचणी, हुमणी किड नियंत्रण सापळा व इतर प्रात्यक्षिक याबाबत कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. सोयाबीन, ज्वारी, कांदा, ऊस, हळद या पिकांबरोबरच भाजीपाला पिकांच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने यावेळी मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
गावातील सार्वजनिक समाजमंदिर येथून सुरू झालेली दिंडी पिंपळ आळी, मल्हारपेठ तसेच ठिकठिकाणच्या चौकात जनजागृती करत आणि हरिनामाचा गजर करत मार्गस्थ होत होती. आ. मकरंद पाटील सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयराव इथापे, उद्योजक नितीन इथापे, वाठार स्टेशनचे एसटी वाहतूक नियंत्रक संतोष चव्हाण आदींनी वारकऱ्यांची व शेतकऱ्यांची चहापान, न्याहारीची व्यवस्था केली होती.
टाळ – मृदंगासह नामघोष व भगव्या पताकांबरोबरच शेतकरी जनजागृती करणारे कृषी तंत्रज्ञानाचा उहापोह करणारे फलक हाती घेत वारकरी संप्रदायिक दिंडीत आणि कृषी जनजागृती उपक्रमात देगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, कार्यकर्ते, शेतकरी तसेच आळंदी येथील वारकरी विद्यार्थीवृंद सहभागी झाले होते. ग्रामपंचायत समोरील चौकात वारकरी फुगडीचा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यात्म आणि शेतकरी जनजागृती उपक्रमाच्या संयुक्त आयोजनाबद्दल संयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.













