Tue, Mar 3, 2026
साहित्य

अभिनय हा भावनांनाच हात घालतो, म्हणुनच अभिनय सर्वाधिक लोकप्रिय – वैभव मांगले

अभिनय हा भावनांनाच हात घालतो, म्हणुनच अभिनय सर्वाधिक लोकप्रिय – वैभव मांगले
Ashok Ithape
  • PublishedMay 23, 2024

वाई, दि. २२: कलेचा प्रभाव हा सादर करणाऱ्या पेक्षा पाहणाऱ्याच्या मानसिकतेवर अधिक अवलंबून असतो. इतर कलांपेक्षा अभिनय हा जवळचा वाटतो कारण त्यातून प्रत्यक्ष अनुभव येतो. माणूस अत्यंत भावनीक आहे आणि अभिनय हा भावनांनाच हात घालतो म्हणूनच अभिनय सर्वाधिक लोकप्रिय झाला. असे प्रख्यात अभिनेते वैभव मांगले म्हणाले. लोकमान्य टिळक संस्था संचालित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या २१व्या पुष्पात ‘अंतरीच्या नाना कला’ या विषयावर ते मुलाखत देत होते. प्रसिद्ध डॉ.शंतनू अभ्यंकर हे मुलाखत घेत होते.

वैभव मांगले म्हणाले, नटाने दिग्दर्शकासमोर जाताना कोरी पाटी घेऊन जावे. दिग्दर्शकासमोर अहंकार बाजूला ठेवून शिकण्याची तयारी ठेवावी लागते. एकाच शैलीत सतत काम केल्याने नट त्या एकाच शैलीपुरता मर्यादित राहतो. मात्र खऱ्या जातीवंत नटाला सर्व भूमिका करता यायला हव्यात. हे केवळ दिग्दर्शकाच्या मदतीनेच शक्य होते. म्हणूनच दिग्दर्शक हा हुशार हवा. कोणताही नट पात्राशी 100% एकजीव होऊ शकत नाही अन्यथा तो नट वेडा होईल. आप्पा बेलवलकर या पात्राचे दुःख स्वतःचे वाटू लागल्याने श्रीराम लागू यांनी नटसम्राट सोडला. अभिनय म्हणजे परकाया प्रवेश नव्हे. अभिनय म्हणजे केवळ त्या पात्राचा अविर्भाव वटवणे होय. अवधान राखून भूमिकेचा अविर्भाव आणतो तो अभिनय.

वाचन हे नटासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. वाचनामुळे नटाचे भाव विश्व मोठे होते.वाचनामुळे कल्पना शक्ती वाढते.
प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एकदा तरी असं वाटतं की या कामाची कलाकृतीची पुनरावृत्ती होतीये. छोट्या पडद्यावर हास्य सिरीयल मध्ये अनेक तांत्रिक बाबी असतात. काहीतरी करून प्रेक्षकांना हसवत राहणं ही दुःखद गोष्ट वाटते. अंगभिक्षेप व्यंग यांचा आधार घेऊन हास्य निर्मिती करणे मला पटेना. म्हणूनच मी हे काम सोडून दिले.

केस नसल्याचा विषाद वाटत नाही. अनुपम खेर सारखे अनेक प्रख्यात नट केवळ त्यांच्या अभिनयामुळे प्रसिद्ध झाले. अभिनेता व्हायचं माझं ध्येय कधीच नव्हतं. मात्र माझ्या जवळच्या लोकांनी मला प्रोत्साहन देऊन मुंबईला पाठवलं. कोणत्याही पालकांना आपल्या मुलाने अभिनेता हवं असं वाटत नाही. माझ्या पालकांनी देखील मला विज्ञान शाखेत घातलं होतं.यामुळे माझी ससेहोलपट झाली. मला कला शाखा घेऊन प्राध्यापक व्हायचं होतं. पाल्याच्या इच्छेविरुद्ध त्याला काही करायला भाग पाडल्यास कित्येक वर्षांचे नैराश्य येते. माझ्या सुदैवामुळे मी यातून सुटलो व नट झालो.
उच्चभ्रू लोकांच्या प्रमाणबद्ध भाषेच्या भीतीमुळे बोलीभाषा संपत चालल्या आहेत. सिनेमांत जी बोलीभाषा दाखवण्याचा प्रयत्न होतो ती मूळ बोलीभाषा नसते. बोलीभाषा म्हणजे गाणं आहे हे गाणं जपलं पाहिजे.

मी दहावी बारावीच्या दरम्यान असताना मला शास्त्रीय गायक व्हावस देखील वाटत होतं. कलाकारांनी शास्त्रीय संगीत विशेष करून ऐकावं. गाणं मला स्वतःला विसरायला भाग पडतं म्हणूनच संगीत ही कला मला श्रेष्ठ वाटते. एक लेखक म्हणतो प्रत्येक कलेला संगीत व्हावसं वाटतं.

किशोरी ताई मला नाट्य म्हणजे काय हे सांगताना म्हणाल्या,रामाची भूमिका सादर करणे म्हणजे राम होण नव्हे. तर रामाचं लेखकाला समजलेलं एक अंग सादर करणे. रामाचं भाव विश्व अनंत आहे ते नाट्यात बसण्यासारखं नाही.

अभिनय आणि संगीता बरोबरच चित्रकला सुद्धा अत्युच्च कला आहे. युरोप व अमेरिकेसारख्या देशांमध्ये चित्रकलेला खूप मान्यता आहे मात्र ती भारतात नाही याचे दुःख वाटते. कलेचा आस्वाद घेताना जीवनाची अनुभूती येते. लॉकडाऊन च्या काळात मला चित्रकला गवसली.

आपला छंद आपला व्यवसाय झाला तर तो परमोच्च आनंद ठरतो. लॉकडाऊन च्या काळात खूप काही शिकायला मिळालं. मूलभूत गरजांच्या अडचणी असताना कलेला फार दुय्यम दर्जा आहे असं वाटू लागलं. या काळात यश व अपयश यांच्या रेषा मी धुसर केल्या. यशापयशाचा अर्थ व्यक्तिपरत्वे बदलत जातो. कामातला आनंदच मी यश मानू लागलो.

अभिनेता होताना माझी पत्नी,काका, सहकारी,टीकाकार अशा अनेकांचा माझ्या कामावर परिणाम झाला. अगदी एका खऱ्या रसिकाचा सुद्धा माझ्या कामावर प्रभाव पडतो.

आपल्या भविष्यातील उपक्रमाबद्दल वैभव मांगले यांनी श्रोत्यांना माहिती दिली. यात त्यांनी नवरा माझा नवसाचा पार्ट टू 21 सप्टेंबरला येणार आहे तसेच तीन नाटके सध्या सुरू असल्याचे सांगितले. पुढच्या वर्षी अलबत्या गलबत्या या नाटकावर सिनेमा येणार असल्याचे सांगितले. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या बरोबर संगीत नाटक करायची इच्छा असल्याचे सांगितले.

मुलाखतीच्या शेवटी तुझेच मी गीत गात आहे हे गाणे वैभव मांगले यांनी सादर केले.तसेच पुलंच्या आंतू बरव्याचे पात्र प्रेक्षकांसमोर वटवले. यामुळे प्रेक्षकांना प्रत्यक्ष कला सादरीकरणाचा अविष्कार पाहायला मिळाला.

ज्येष्ठ पत्रकार भद्रेश भाटे यांनी आभार प्रदर्शन केले. सौ. वर्षा वसंत बेडेकर व श्री. अनिल मोरेश्वर देव यांनी या कार्यक्रमाचे प्रायोजन केले होते. प्रचंड मोठ्या प्रमाणावर रसिकांनी उपस्थिती दर्शवली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!