![]()
गावागावात जलसंधारणाची कामे होण्यासाठी पैसा नसणे, हा प्रॉब्लेम नाही. ग्रामस्थांचे ऐक्य गरजेचे आहे, हे जलयुक्त गावांनी दाखवून दिले आहे,असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे सल्लागार डॉ. अविनाश पोळ यांनी वाई येथे केले.
वाई l प्रतिनिधी:
वाई पंचायत समिती व जिल्हा परिषद आयोजित जलसंधारणाचा जागर व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी पंचायत राज प्रशिक्षण केंद्र (सातारा)चे प्राचार्य विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पोळ म्हणाले, निसर्गाचे संतुलन ढासळलेले आहे. कृष्णा नदी लक्षावधी लोकांचा उद्धार करीत आहे. परंतु ती दूषित बनली आहे. त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागणार आहेत.
जलक्रांती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करा. पाणी फाउंडेशनचे यश तळागाळा पर्यंत जाऊन दिलेल्या प्रशिक्षणात आहे. प्रत्येक गावाचा आराखडा तयार करा, शासकीय योजनांचा अभ्यास करा. सर्व विभागांचे सहकार्य मिळवा. शासकीय अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा आणि गावाचा विकास साधा.
सुखदेव भोसले यांनी वेळू गावातील जलसंधारणाचे अनुभव सांगितले. बाळासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात गट विकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले,पाणी आडवणे, पाण्याची बचत करणे, हा ग्रामविकासाचा पाया आहे. ग्रामस्थांची इच्छाशक्ती कवठे, वेळे पाचवड, धावडी, केंजळ आदी गावात दिसून आली. प्रत्येक गावात पाणी आले किती, वापरले किती, शिल्लक किती याचा ताळेबंद तयार करून पाण्याचे व्यवस्थापन व नियोजन करावे.
कृषी अधिकारी शांताराम गोळे, रुपेश मोरे, राहुल हजारे यांनी स्वागत केले. दीपक बाबर, रेश्मा जगताप, शामराव गाडे, निखिल सोनावणे,अल्पना यादव, तुकाराम पाटील, दशरथ पवार, दिव्यराज बनसोडे व गावोगावचे सरपंच, उपसरपंच जलसंधारण समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.













