Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

यशवंत विचारांचा खरा पाईक हरपला..अखेरचा निरोप घेताना वरुणराजा ही ढसा ढसा रडला..

यशवंत विचारांचा खरा पाईक हरपला..अखेरचा निरोप घेताना वरुणराजा ही ढसा ढसा रडला..
Ashok Ithape
  • PublishedMay 19, 2024

 स्व.भाऊंना विनम्र श्रद्धांजली

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे रविवारी पहाटे भुईंज येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. विविध मान्यवरांसह प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत भुईंज येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे सुपूत्र मदन भोसले यांच्यासह मोहन भोसले, गजानन भोसले यांनी मुखाग्नी दिला.

सलग चार वेळा वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कॅबिनेट मंत्री, सातारा लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा खासदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद तसेच विविध राज्य व केंद्रीय समित्यांचे अध्यक्षपद भूषविणार्‍या प्रतापराव भोसले यांनी संपूर्ण कारकिर्दीत कधीच कोणता किंचितसा डाग लावून घेतला नाही. तळागाळातील जनतेचा विचार करता साामाजिक, सहकार, कृषी, शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनमोल योगदान दिले.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भुईंज येथील निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी उसळली. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सौ. सुनेत्रा पवार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेद्रसिंह हुडा यांनी फोन व शोकसंदेशाद्वारे शोक व्यक्‍त केला.

फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. अशा शोकाकुल वातावरणात निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत हजारांचो जनसमुदाय सहभागी झाला होता. अंत्यसंस्कारस्थळी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हासदादा पवार, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, विशाल प्रकाशबापू पाटील, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, धैर्यशील कदम, डॉ. सुरेश जाधव, नितीन भरगुडे पाटील, प्रताप देशमुख, शिवाजीराव महाडीक, विठ्ठल माने, दिपक ननावरे, कुमार बाबर, जयवंत पिसाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, डॉ. प्रियंका शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी भुईंज येथे येवून अंत्यदर्शन घेतले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!