Thu, Jan 15, 2026
साहित्य

‘जलोदेव भव’ अस म्हणत जलरक्षक होण्याचा संकल्प आज प्रत्येकानेच करायला हवा – मकरंद टिल्लू

‘जलोदेव भव’ अस म्हणत जलरक्षक होण्याचा संकल्प आज प्रत्येकानेच करायला हवा – मकरंद टिल्लू
Ashok Ithape
  • PublishedMay 9, 2024

वाई दि. 9 : जन्मापासून लयापर्यंत साथ देत ते जल. अगदी आईच्या गर्भात असल्यापासून पाणी आपलं रक्षण करत आहे आता आपण पाण्याचं रक्षण करण्याची गरज आहे. ‘जलोदेव भव’ अस म्हणत जलरक्षक होण्याचा संकल्प आज प्रत्येकानेच करायला हवा. असे वक्तव्य ‘कृती केली तर वृत्ती बदलते’ असं सांगणारे समाजसुधारक व कलाकार श्री. मकरंद टिल्लू यांनी केले. लोकमान्य टिळक संस्था संचालित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या आठव्या पुष्पात ‘१०० कोटी लिटर पाणी वाचवणाऱ्या माणसाची टिल्लू गोष्ट’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. कवी, लेखक व विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. राजेश भोज हे यावेळी अध्यक्षपदी होते.

व्याख्यानाची सुरुवात मकरंद टिल्लू यांनी एका सुंदर हास्यसत्राने केली. मकरंद टिल्लू म्हणाले, “मी राबवत असलेल्या जलमोहिमेच्या आज २२५ हुन अधिक शाखा आहेत तसेच २५ हजाराहून अधिक सदस्य आहेत. ही गोष्ट फक्त एका माणसाची नाही ही गोष्ट आहे पाणी वाचवू इच्छिणाऱ्या साऱ्यांचीच. या गोष्टीची सुरुवात २०१२ च्या बीड-लातूर मधील दुष्काळापासून झाली. यावेळी तेथील सुकलेले धरण पाहून मला दुःख झाले तेव्हाच जलरक्षणाची प्रतिज्ञा मी घेतली.

पाण्याची बचत करायची असेल तर चार बदल करावे लागतात. त्यातला पहिला म्हणजे सामाजिक सवयीत बदल. यासाठी मी हॉटेल व्यवसायापासून सुरुवात केली. हॉटेलमध्ये प्रचंड पाणी वाया जातं. ग्राहकाला ग्लास भरून पाणी न देता तेथील जार मध्ये पाणी भरून ठेवणे व ग्राहकाला हवे तेवढे त्याचे त्याने घेणे हा प्रकल्प आम्ही राबवायला सुरुवात केली. बघता बघता एका वर्षात ७०० हून अधिक हॉटेल्सनी या प्रकल्पात सहभाग घेतला व ७० टक्के पाण्याची बचत झाली. दुसरा बदल म्हणजे व्यक्तिगत सवयींमध्ये बदल. याची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते. तिसरा बदल म्हणजे गळती थांबवा.

महाराष्ट्रात असंख्य तुटलेले, गळणारे, तोटी नसलेले नळ आहेत. या एका नळातून वर्षभरात लाखो लिटर पाणी वाहून जात. हे थांबवण्यासाठी आम्ही शाळा, कॉलेज, झोपडपट्ट्या, वस्त्या इथे फिरून नळदुरुस्त केले. तेथील विद्यार्थ्यांना, लहान मुलांना यात सहभागी करून घेतलं. अशा प्रकारे आज पर्यंत आम्ही ३० हजाराहून अधिक नळदुरुस्त केले आहेत. चौथा बदल म्हणजे जलपुनर्भरण ही मोहीम राबवत असताना अनेक प्रसंगांमुळे अधिक हुरुप आला. असा एक प्रसंग म्हणजे एका वयस्कर गृहस्थांनी आपल्या ७५वा वाढदिवस नळतुला करून साजरा केला.

लोक अनाथ मुलांसाठी काम करतात मी अनाथ नळांसाठी कार्य करतो. गेली बारा वर्ष मी चालवत असलेली संस्था कॅशलेस आहे. आम्ही मदत स्वीकारतो ती फक्त श्रमदान, प्लंबरदान, नळदान आणि व्याख्यान या स्वरूपातच. कारण व्याख्यानमाला हे परिवर्तनाचे केंद्र आहे. गळती मुक्त शाळा, वस्ती, शहर ते गळती मुक्त भारत करण्याचं आमचं ध्येय आहे.”

माणूस अनुकरणशील प्राणी आहे. तुमची कृती बदला तुमच्या कृतीतून जग बदलणार आहे हा आत्मविश्वास ठेवा आणि जलरक्षणाची सुरुवात करा. असे आव्हान श्रोत्यांना करून मकरंद टिल्लू यांनी त्यांच्या व्याख्यानाचा समारोप केला.

श्री. राजेश भोज यांनी अध्यक्षीय मनोगताद्वारे जलरक्षणाचे महत्त्व आणि गरज अधोरेखित केली. सौ. सुनीता कळसे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.आभार शिवाजी कदम यांनी मानले.
सोनगीरवाडीचे ग्रामस्थ श्री. संदीप उपेंद्र माने यांनी या व्याख्यानाचे प्रयोजन केले होते.यावेळी पुणे चे नवचैतन्य हास्य योग्य परीवाराचे विश्वस्त प्रमोद ढेपे,जयंत दशपुत्रे, ज्ञानदीपचे दिलीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!