Thu, Jan 15, 2026
साहित्य

लोकमान्य टिळक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या सातव्या पुष्पात ‘मराठी आणि तिचा ग्रंथ व्यवहार’ या विषयावर प्रसिद्ध लेखक श्री. घनश्याम पाटील यांचे मार्गदर्शन

लोकमान्य टिळक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या सातव्या पुष्पात ‘मराठी आणि तिचा ग्रंथ व्यवहार’ या विषयावर प्रसिद्ध लेखक श्री. घनश्याम पाटील यांचे मार्गदर्शन
Ashok Ithape
  • PublishedMay 9, 2024

यावेळी शिवप्रताप कादंबरीचे लेखक उमेश सणस यांनी अध्यक्षपद भूषविले

वाई दि. ८ :

१९०९ मध्ये झालेल्या ‘मराठी भाषा मृतावस्थेत आहे ?’ या परिसंवादापासूनच मराठी भाषेच्या अस्तित्वाची काळजी वाहिली जात आहे. मात्र मराठी भाषिक, मराठी लेखक-कवी, मराठी वाचक मराठीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी समर्थ आहेत. मराठी भाषेच्या अस्तित्वाची काळजी मला नाही! माय मराठीचे अस्तित्व असे सहज संपणारे नाही. अशी खात्री चपराक प्रकाशक, संपादक आणि प्रसिद्ध लेखक श्री. घनश्याम पाटील यांनी आपल्या व्याख्याना द्वारे व्यक्त केली.

लोकमान्य टिळक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेच्या सातव्या पुष्पात ‘मराठी आणि तिचा ग्रंथ व्यवहार’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. यावेळी शिवप्रताप कादंबरीचे लेखक उमेश सणस हे अध्यक्षपदी होते.

घनश्याम पाटील म्हणाले, “आज मराठी भाषा उपजीविकेचे साधन होऊ शकत नाही असा नव्या पिढीचा गैरसमज आहे. मात्र कोणत्याही मराठी लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या घरी एकदा भेट द्या. मराठीने कायमच तिच्या उपासकांना समृद्ध केले आहे. मराठी आणि तिच्या समृद्ध ग्रंथ व्यवहाराची परंपरा जर अशीच पुढे चालू ठेवायची असेल तर नवोदित लेखकांचे स्वागत व्हायला हवे. केवळ प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांना प्रतिसाद देणे हे मराठी वाचकाला शोभत नाही. लेखकापेक्षा दर्जेदार लिखाणावर अधिक लक्ष केंद्रित व्हायला हवे.

आज मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून मागणी केली जाते. मात्र मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आवश्यक असणाऱ्या निकषांचा कोणीही अभ्यास करत नाही, त्या दृष्टीने प्रयत्न करत नाही. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, इंग्रज ते आजच्या आधुनिक मराठीपर्यंतचा प्रवास समजून घेण्याची तसदी कोणीही घेत नाही. आज वृत्तपत्रांचे वाचक कमी झाले आहेत. मासिक हा साहित्यप्रकार तर मरणासन्न अवस्थेत आहे.

समाज माध्यमांमुळे वाचन कमी होत आहे असा आरोप केला जातो. मात्र या माध्यमांचा वापर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी करता येतो. जागेचे भाडे परवडत नाही म्हणून ग्रंथालय बंद पडतात. अशावेळी नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेणे गरजेचे आहे. ई बुक्स, ऑडिओ बुक्स यांचा वापर करून आज मोबाईलच्या माध्यमातून मराठी व तिचा ग्रंथ व्यवहार वाढवता येऊ शकतो. याची सुरुवात चपराक प्रकाशनने केली आहे.

आज मराठी भाषेला असलेला पहिला धोका हा आहे की आज मराठीमध्ये दर्जेदार लेखन होत नाही. उच्च पदाधिकारी, प्रसिद्ध उद्योजक आदींकडून अमाप पैसे घेऊन प्रकाशक त्यांची पुस्तके छापतात. मात्र त्यांचे लेखन सुमार दर्जाचे असते अशी पुस्तके वाचून मराठी वाचकाचा वाचनातला गंध जातो. मराठी भाषेसमोरचा दुसरा धोका म्हणजे साहित्य संमेलनांमध्ये होत असलेली पुनरावृत्ती. सतत मराठी भाषेशी दुरान्वयानेही संबंधित नसलेल्या प्रसिद्ध लोकांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करणे हा मराठी भाषेशी अवमान आहे. अगदी मोठमोठे साहित्यिक पुरस्कार देखील विकत घेण्यात येतात. यामुळे मराठी भाषेचा मान ढळतो.

कार्यक्रमांमध्ये ‘बुके ऐवजी बुक’ अशी संकल्पना राबवली तर नक्कीच मराठीचा ग्रंथ व्यवहार अधिक सुधारेल. बालवाचक तयार झाले तर मराठीची पुढची वाचक पिढी तयार होईल. तुम्ही फक्त मराठी वाचा आणि मराठीत लिहा मराठीच्या जतनाची काळजी करण्याची गरज उरणार नाही.”

घनश्याम पाटील यांनी शिवप्रताप, दखलपात्र आदी कादंबऱ्यांच्या प्रकाशनात त्यांना आलेले अनुभव सांगितले. तसेच आजच्या लेखकांची आणि प्रकाशकांची खरी परिस्थिती व्याख्यानमालेत मांडली. मराठी भाषेची दशा आणि दिशा बदलण्याचे आश्वासन देऊन पाटील यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला. उमेश सणस यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. श्री. आनंद शेलार यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. कु. सायुरी सणस हिने आभार मानले.

कला सागर अकॅडमी (प्रा.लहूराज पांढरे प्रा. हेमंत काळोखे ) व ॲड. शाश्वत श्रीनिवास कुलकर्णी यांनी या सातव्या पुष्पाचे प्रायोजन केले होते. श्रोत्यांद्वारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!