Mon, Mar 2, 2026
साहित्य

पानिपत ही मराठ्यांच्या धवल यशाची आणि विध्वंसक अपयशाची कहानी; वाईच्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटनपर पुष्प गुंफताना विश्वास पाटील यांचे प्रतिपादन

पानिपत ही मराठ्यांच्या धवल यशाची आणि विध्वंसक अपयशाची कहानी; वाईच्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटनपर पुष्प गुंफताना विश्वास पाटील यांचे प्रतिपादन
Ashok Ithape
  • PublishedMay 2, 2024

वाई l दि. 1 :

येथील लोकमान्य टिळक स्मारक संस्था आयोजित १०८ व्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन अत्यंत उत्साहपुर्ण वातावरणात पार पडले. यावेळी ‘पानिपत’ कार श्री विश्वासराव पाटील यांनी प्रमुख वक्ता म्हणून व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफले. डॉ.शंतनु अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले

या वेळी विश्वास पाटील म्हणाले “महाराष्ट्रात पाटील हे उसाचा फड, कुस्तीचा फड, अथवा तमाशाच्या फडामुळे ओळखले जातात. मी मात्र केवळ शब्दांच्या फडातच रमलो‌.

मराठ्यांच्या धवल यशाची व त्याचप्रमाणे विध्वंसक अपयशाची कहाणी पानिपत आहे. त्यामुळेच मी या विषयाकडे आकर्षित झालो व हा संपूर्ण इतिहास मराठी वाचकांसमोर मांडण्याची प्रेरणा मला मिळाली.

दत्ताजी शिंदे, अहमदशहा अब्दाली, भाऊसाहेब यांच्या तोंडच्या संवादाचा विचार करताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहत होते. माझ्या ऐतिहासिक कादंबऱ्यावर आधारित चित्रपट व मालिकांमध्ये योग्य इतिहास दाखवला जात नाही. तो मराठी रसिकांसमोर मांडणे गरजेचे आहे.

‘पानिपत’ ते ‘महासम्राट शिवाजी’ या विषयावर ते बोलत होते. त्यांच्या पानिपत झाडझडती पासून ते महानायक मधील सुभाष चंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा त्यांनी केला. सुभाषचंद्र बोस यांचे जपान मधील वास्तव्य येथील लोकांची त्यांच्या जडलेली श्रद्धा, युद्ध काळात जपानद्वारे त्यांना करण्यात आलेली सैनिकी मदत आणि त्यांचे देशप्रेम याचे विश्लेषण विश्वास पाटील यांनी केले.

‘महासम्राट शिवाजी’ या त्यांच्या कादंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडताना शहाजी महाराज, लखोजीराव जाधव, जिजाबाई या व्यक्तिरेखांचा त्यांच्यावर काय परिणाम झाला तसेच शिवाजी महाराजांचे दूरदृष्टी व नियोजन क्षमता यावर त्यांनी भाष्य केले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील केवळ ठराविक प्रसंग महत्वाचे नसून त्यांच्या प्रत्येक लढाईतील बारकावे लक्षात घेणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन त्यांनी केले.

शिवरायांना केवळ आणखी १० वर्ष आयुष्य लाभले असते तर महाराष्ट्राची तलवार लंडनमध्ये पोहोचलेली असती असे वक्तव्य त्यांनी केले.

महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्रात निर्माणात शहीद झालेल्या १०७ हुतात्म्यांची नावे मंत्रालयाच्या भिंतीवर कोठेही नाहीत याची खंत त्यांनी व्यक्त केली.

डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन केले. वसंत व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष डॉ. चिंतामणी केळकर यांनी प्रास्ताविक केले. लो टि स्मारक संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. तसेच डॉ. मेधा साळवेकर यांनी आभार मानले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रायोजक गरवारे टेक्नीकल फायबरच्यावतीने सुनिल पानसे, कुमार पवार व मालाज फूड प्राॅडक्स यांचाही पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन पाटील यांचे हस्ते करण्यात आले.व्याख्यानासाठी वाई व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!