दिव्यांगांनी मतदानाची जबाबदारी पार पाडावी : शिंदे
पुणे l प्रतिनिधी:
आपण आपल्या हक्कासाठी एक भारतीय नागरिक म्हणून अधिकार दाखवतो त्याप्रमाणे देशाच्या निवडणूक प्रक्रियेत दिव्यांगांनी आपले मतदानाचे कर्तव्य आपली जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे असे मत पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समुपदेशक हरिदास शिंदे यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी सेवा संघ संचलित सातारा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व सातारा जिल्हा समाजकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मतदार जागृतीसाठी आयोजित ऑनलाईन चर्चासत्रात शिंदे बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन घुले, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, महात्मा गांधी सेवा संघांचे सचिव विजय कान्हेकर, सातारा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक गौरव जाधव पुण्याचे जिल्हा समन्वयक अशोक सोळंके, सातारा डिस्ट्रिक्ट आयकॉन संस्कृती मोरे यांचेसह सातारा जिल्ह्यातील दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रातील विविध संस्था-संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
चर्चासत्रादरम्यान नितीन घुले यांनी निवडणूक प्रक्रियेत दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष सुविधांची माहिती दिली. नितीन उबाळे यांनी तसेच संस्कृती मोरे यांनी दिव्यांगांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले.शेवटी खुल्या चर्चेत दिव्यांगांच्या प्रश्नांना उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.
चर्चासत्राचे प्रास्ताविक विजय कान्हेकर यांनी केले तर सत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गौरव जाधव यांनी केले.













