Mon, Mar 2, 2026
राजकीय बातमीपत्र

महायुतीतर्फे साताऱ्यातून उदयनराजेच…!

महायुतीतर्फे साताऱ्यातून उदयनराजेच…!
Ashok Ithape
  • PublishedApril 16, 2024

भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढणार, रामनवमीच्या मुहूर्तावर बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार.

सातारा /प्रतिनिधी-

सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर बुधवार, दि. 17 एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपच्या मुख्य कार्यालयातून जाहीर झालेल्या यादीतील उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे कमळ या भाजपच्या चिन्हावर ते निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे.

उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारी निश्चितेमुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सन १९५२ पासून सातारा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी प्रदीर्घकाळ या मतदारसंघाचे नेतृत्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत हा मतदार संघ १९९६ चा अपवाद वगळता कायम काँग्रेसचा राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर अद्यापपर्यंत सातारा लोकसभा मतदार संघावर शरद पवारांच्या विचारांचा प्रभाव व पगडा राहिला.

१९९९ नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सातारा लोकसभा मतदार संघाने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लोकसभेत पाठवला. १९९९, २००४ या साली लक्ष्मणराव पाटील यांना व २००९, २०१४, २०१९ सलग तीनवेळा छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातील जनतेने राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार केले.

२०१९ साली राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या उदयनराजेंनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार व शरद पवारांचे जिवलग मित्र श्रीनिवास पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर उभे असलेल्या श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा पराभव केला. मोदी लाटेतही हा मतदार संघ शरद पवारांबरोबर राहिला.

सातारा लोकसभा मतदार संघात २०२४ च्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. भाजपने येथून राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. उदयनराजेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराचा झंझावात निर्माण केला होता.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!