Mon, Mar 2, 2026
सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वाई परिसरात विविध कार्यक्रमांनी साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वाई परिसरात विविध कार्यक्रमांनी साजरी
Ashok Ithape
  • PublishedApril 14, 2024

अनुयायांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी महामानवास केले अभिवादन

वाई / प्रतिनिधी – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वाई परिसरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. अनुयायांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन केले.

येथील सामाजिक समरसता गतिविधि संस्थेतर्फे किसन वीर चौक येथे सकाळी ठीक आठ वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सामाजिक समरसता गतिविधिचे संयोजक सुधीर सूर्यवंशी यांनी भीमवंदना करून उपस्थित बंधू – भगिनींचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तदनंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते निवृत्त न्यायाधीश दिनकरराव कांबळे वयगाव ता.वाई तसेच प्रमुख पाहुणे प्रा. शेखर फरांदे ओझर्डे, ता. वाई यांचे हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजनानंतर वाई शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संस्थांच्या आणि मंडळांच्या प्रतिनिधींनी महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह विजयराव जमदाडे यांनी प्रमुख वक्ते व प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला आणि त्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाला दरवर्षी आवर्जून उपस्थित राहणारे आर.पी.आय. चे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांचेही श्री.जमदाडे सरांनी पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रमुख वक्ते दिनकराव कांबळे यांनी त्यांचे समायोजित मनोगत व्यक्त केले.

ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन हा ज्ञानदिन म्हणून साजरा करावयास हवा. बाबासाहेबांनी आपल्या जीवनभर सामाजिक विषमतेविरुध्द तीव्र संघर्ष केला.

जातीअंतासाठी जिवाचे रान केले. इतकेच करून ते थांबले नाहीत तर पुरुष प्रधान संस्कृतीत भरडल्या गेलेल्या स्त्रियांना सामाजिक दास्यातून मुक्त करण्यासाठीही त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. दलित आदिवासींसह समाजातील सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब अखेर पर्यंत आग्रही राहिले. शेतकरी वर्गासाठीसुध्दा त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

सामाजिक समस्या आणि देशाची एकता याबाबत जेव्हा जेव्हा गंभीर तिढा निर्माण झाला तेव्हा तेव्हा देशहितालाच त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याबाबत या महामानवाने कधीच तडजोड केली नाही. अशाप्रकारे त्यांचे राष्ट्रप्रेम जाज्वल्य होते, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आपण प्रथम भारतीय आहोत हे कधीही विसरू नका. जात, पंथ, भाषा, प्रांत याबाबत कोणताही भेदभाव मनात न ठेवता एका विचाराने आणि बंधुत्वाच्या भावनेने आपण सर्वांनी राहिले पाहिजे. समरसतेचा भाव प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झाला तरच आपल्या देशात समता सुखनैव नांदेल, हाच बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा सारांश असल्याचेही ते म्हणाले.

अशोकराव गायकवाड यांचेही यावेळी समायोजित भाषण झाले.
शुभंकर भागवत यांनी बुद्धवंदना म्हटली. त्यानंतर सचिन पानसे यांनी म्हटलेल्या सामाजिक समरसता प्रतिज्ञामध्ये उपस्थितांनाही सामील करून घेण्यात आले.

सामाजिक समरसता गतिविधि जिल्हा सदस्य सुनील सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!