शिवेंद्रसिंहराजे यांच्या बैठकीत उदयनराजे यांच्या पाठिंब्याला विरोध: नगरसेवकांकडून तक्रारींचा पाढा..
![]()
ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने यांची उदयनराजें विरोधात आक्रमक भूमिका: उमेदवारीला केला ठाम विरोध..
भुईंज: महेंद्रआबा जाधवराव
महायुतीकडून सातारा लोकसभेसाठी अद्याप कोणालाही उमेदवारी जाहीर झाली नसली तरी महायुतीकडून उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.
त्याच अनुषंगाने आज सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी लोकसभेच्या अनुषंगाने सातारा जावळीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरुची निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर उदयनराजे यांच्या विरोधात अनेक नगरसेवकांनी तक्रारीचा पाढा वाचला असून ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने व अविनाश कदम यांनी उदयनराजे यांच्या उमेदवारीला ठाम विरोध केला आहे.
ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विरोध पाहून शिवेंद्रराजे यांनीही कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन दिले. परंतु पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचे काम आपल्याला करावेच लागेल पक्षाविरोधात कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये असा आदेशही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. हा आदेश कार्यकर्ते पाळणार का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
सातारा लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येईल तस तसे वातावरण तापत चालले आहे. एकीकडे महायुतीकडून उमेदवारी मिळणार या दृष्टिकोनातून उदयनराजे जिल्हा पिंजून काढत आहेत. अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत.कोणत्याही परिस्थितीत यंदा लोकसभा निवडणूक जिंकायचीच असा चंग त्यांनी बांधला आहे.
नुकतेच शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंची भेट घेऊन झप्पी आणि पप्पी दिली होती.शिवेंद्रराजे यांनीही यावेळी उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध नसल्याचे स्पष्ट केले होते. पक्षाने त्यांना जर उमेदवारी दिली तर मी नक्कीच काम करणार असे त्यांनी यावेळी ठाम सांगितले होते.
लोकसभेच्या अनुषंगाने आज शिवेंद्रराजे यांनी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक सुरुची निवासस्थानी आयोजित केली होती.
यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सातारा शहर आणि सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली. आता लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पाठीशी ताकद निर्माण करायची आहे. त्यासाठी 8 रोजी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखानास्थळी कोरेगाव व सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत सातार्यातून पक्ष देईल त्या उमेदवाराचे सर्वांनी काम करावे, चर्चा होतात, आरोप-प्रत्यारोप होऊन त्याच्या बातम्या येत असतात. त्यामुळे आपल्याला ताकद कुणी दिली? विकासकामांना निधी कुणी दिला? हे लक्षात ठेवून पक्षाचे काम आता करायचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकष न लावता सातारा-जावली विधानसभा मतदारसंघ असो किंवा सातारा शहरातील विकासकामांना कधीही निधी कमी पडू दिला नाही.
त्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत.त्यामुळे त्यांच्या पाठीशी ताकद निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. मागील वेळी 44 हजाराचे असलेले मताधिक्क्य यावेळी 60-70 हजाराच्यावर वाढले पाहिजे. आताही ताकद लावायची असून स्थानिक संघर्ष सुरु असून तो भविष्यातही कायम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपली ताकद वाढली आहे. विकासाच्या बाबतीत त्यांनी काहीच मागण्याची वेळ येऊ दिली नाही. किंबहुना दुसर्याच्या दारात जाण्याचीही वेळ येऊ दिली नाही. जसा मी तुमच्या पाठीशी आहे तसे फडणवीस माझ्या पाठीशी आहेत.
लोकसभा निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवारांचे काम सर्वांना करायचे आहे. खासदारकीचा निकाल वेगळा आला तर आपल्याला अडचणी निर्माण होतील. निवडणुकीत एखादे गणित बिघडले तर दुरुस्त करायला वेळ लागतो. लोकांची मानसिकता लगेच बदलणे शक्य होत नाही. गावागावात, प्रभागांत निरोप द्या. प्रतापगड कारखान्याच्या कार्यस्थळीही कर्मचार्यांना सुचना करा. प्रतापगड ही बंद पडलेली संस्था पुन्हा सुरु झाल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हातगेघरचे पाणी लवकरच येणार आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत अजिंक्यतारा साखर कारखाना अजून सुरु आहे. शेतकर्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. मतदारसंघातून जास्तीत जास्त लोक मेळाव्यास उपस्थित राहतील असे नियोजन करावे. मेळाव्याच्या वेळेविषयी माहिती घेऊन कळवले जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगर विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक माजी नगराध्यक्ष अशोक मोने यांनी मागील निवडणुकीत घडलेल्या घटनांनाबाबत उदयनराजे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की,खासदारकीची निवडणूक आली की आपण सर्वजण काम करतो. पण आपल्या आमदारकीच्या निवडणुकीवेळी मात्र त्रास दिला जातो. उकाळ्यापाकाळ्या काढल्या जातात. मतदारसंघातून मताधिक्य दिले तरी काम केले नाही असा आरोप आपल्यावर होतो. स्थानिक संघर्ष अद्याप सुरुच आहे. मेळाव्यात एकदाचा काय तो निर्णय घ्यावा. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवाव्यात असे म्हणत उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केला.
माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी ही तक्रारीचा पाढा वाचला,खासदारकीची निवडणूक झाली की याला बघतो, त्याला बघून घेतो अशी दमबाजी केली जाते. सातारा पालिका निवडणुकीत सर्वसामान्य उमेदवार हवा म्हणून त्यांनी भूमिका घेतली. आता लोकसभा निवडणुकीत खासदकीला सर्वसामान्यच उमेदवार द्या, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर खपल्या काढल्या जातात. खासदारकीच्या निवडणुकीपूर्वी या प्रकारांना वेसण बसणार का? अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
त्यानंतर आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, यापूर्वी लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब महाराज यांच्या विरोधातही काम झाले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर तुमच्या भावना मांडल्या जातील. तुमच्या शिष्टमंडळासह त्यांची भेट घेऊ. पण सर्वांनी पक्ष देईल त्याच उमेदवारांचे काम करायचे आहे. पक्षाविरोधात कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये. विधानसभा निवडणूक जवळ आली असून मतदारसंघात चांगले वातावरण आहे. कुणाकडे जायची आवश्यकता नाही हा विश्वास आपण कमावला आहे. प्रचारासाठी कुणाला सांगा..बोला.. म्हणायची गरज पडणार नाही. पक्षाचे नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.













