Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता

मग्रारोहयो योजनेअंतर्गत बांबु लागवड कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ; बापुसाहेब शेळके, जिल्हा कृषी अधिकारी

मग्रारोहयो योजनेअंतर्गत बांबु लागवड कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ; बापुसाहेब शेळके, जिल्हा कृषी अधिकारी
Ashok Ithape
  • PublishedMarch 27, 2024

वाई : दि. २७
मग्रारोहयो योजनेअंतर्गत बांबु लागवड कार्यक्रमानुसार लगडवाडी ता. वाई येथे श्री. शरद मारुती मोरे यांचे बांबु लागवडीचे कामास श्री. बापुसाहेब शेळके, जिल्हा कृषी अधिकारी (मग्रारोहयो), जि. प. सातारा यांनी भेट दिली. खंडाळा तालुक्यातील नरेगाचे कामाबाबत समाधान व्यक्त केले.

मग्रारोहयो योजनेअंतर्गत मा. मुख्यमंत्री यांचेकडील निर्देशानुसार सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बांबु लागवड हा महत्वकांक्षी कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रम मा. जिल्हाधिकारी, सातारा व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा यांचे मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषद, कृषि विभाग, सामाजिक वनीकरण, व वन खात्यामार्फत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, सातारा यांनी ग्रामपंचायत विभागास ८२१० हेक्टर बांबु लागवडीचा लक्षांक दिलेला आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडील लक्षांक मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सातारा याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प.) अर्चना वाघमळे व कृषि विकास अधिकारी, विजय माईंकर यांचे मार्गदर्शनाने कृषि व ग्रामपंचायत विभागामार्फत राबविण्यात येत आहे. बांबू लागवड साठी शासनामार्फत ६ लाख ९० हजार अनुदान देण्यात येत आहे. सदर बांबु लागवडीसाठी लागणारी रोपेसुध्दा शासनाकडून मोफत दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फक्त लागवडीसाठी संमती असणे गरजेचे आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ४१३४ शेतकऱ्यांचे २२४५.४४ हेक्टर प्रस्ताव प्राप्त असून दहिवडी, खटाव, फलटण, कराड, वाई, जावली ई. तालुक्यातील प्रयोगशील ३४२ शेतकऱ्यांनी १९१.३५ हेक्टर क्षेत्रावर सदर योजनेचा लाभ घेऊन सातारा जिल्ह्यात बांबु लागवड होऊ शकते याचा आदर्श सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
बांबु लागवड ही ३०-३५ वर्षाचे पीक असून ३-४ वर्षांपासून उत्पादन चालु होते. पहिले ३-४ वर्षे आंतरपीक घेता येत असलेने शेतकऱ्यांसाठी बांबु लागवड अत्यंत किफायतशीर आहे.

तसेच सदर पिकास किड-रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्याने उत्पादन खर्चदेखील खूप कमी आहे. ग्लोबल वॉर्मिंग तथा वाढत्या तापमान वाढीचे संकटाला उत्तम पर्याय असलेल्या बांबु पासून जवळपास १८०० प्रकारच्या वस्तू /उत्पादने तयार होत असलेने भविष्यात बांबु पीक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके यांनी केले आहे.

सदर प्रक्षेत्र भेटी वेळी सरपंच श्री. सर्जेराव पवार, श्री. मोहनराव गोळे, सूर्यकांत भोसले, कृषि अधिकारी, शांताराम गोळे, तांत्रिक अधिकारी, राहुल बोराटे, सागर जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
———————————————————–
टंचाई व दुष्काळाचे पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबु लागवडीसोबत राबविण्यात येणाऱ्या पाणंद रस्ता, आदर्श शाळा संरक्षक भिंत, खेळाचे मैदान, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सार्वजनिक तसेच सिंचन विहीर, शेततळे, फळबाग लागवड, जनावरांचा गोठा, घरकुल व गांडूळ-नाडेप या वैयक्तिक लाभांच्या योजना या रोजगार निर्मितीसाठी उत्तम पर्याय आहेत. गावपातळीवर जिल्ह्यातील सर्व शेतकरी व पदाधिकारी यांनी या सर्व योजनांची अंमलबजावणी करुन टंचाईला सामोरे जाणेकरिता सज्ज व्हावे – याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. सातारा.
————————————————————————–

(अधिक माहितीसाठी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी, कृषि अधिकारी/विस्तार अधिकारी (पं. स.) व पॅनल तांत्रिक अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.)

योजना व अनुदान रक्कम :
1. बांबू लागवड – 6 लाख 90 हजार प्रति हेक्टर
2. सिंचन विहीर – 4 लाख
3. शेततळे (अस्तरीकरण सह) – 6 लाख 31 हजार
4. जनावरांचा गोठा : 1 लाख 54 हजार
5. गांडूळ व नाडेफ – प्रत्येकी 16.500 हजार

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!