महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे यांच्या स्मृतिदिनी कृष्णाकाठी रंगला अनोखा मेळा
![]()
श्रीमती राधाबाई साबळे यांच्या उपस्थितीत शाहिरांच्या मायभूमीत आठवणींना उजाळा देणारा कार्यक्रम संपन्न.
वाई / प्रतिनिधी – महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या मायभूमीत कृष्णाकाठी त्यांच्या पत्नी श्रीमती राधाबाई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहिरांच्या आठवणींना उजाळा देणारा अनोखा सांस्कृतिक मेळा संपन्न झाला.
शाहीर साबळे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शाहिरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे जुने सहकारी सुभाष खरोटे, मनोहर गोलांबरे, अशोक वायंगणकर, ज्ञानेश्वरबुवा ढोरे, चंद्रकांत पांचाळ आणि शाहीर प्रवीण फणसे आदींनी शाहीर साबळे यांच्या निवडक गाण्यांचे सादरीकरण करून त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
शाहिरांनी गायलेल्या जय जय महाराष्ट्र माझा ….या गीताला यंदा शासनाने महाराष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त करून दिल्याने शाहिर साबळे यांच्या कला कीर्तीला विशेष गौरव प्राप्त झाल्याचे यावेळी श्रीमती राधाबाई साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शाहिरांची साथ केलेल्या सर्वच कलावंतांनी व नव्या पिढीतील कलाकारांनीही यावेळी समयोचित गीते सादर करून शाहीर साबळे यांच्या स्मृतींना सांस्कृतिक आदरांजली अर्पण केली.
शाहीर साबळे यांचे पुतणे संजय साबळे व सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने यांनी केले. गजानन जाधव यांनी साऊंड सर्विहसची उत्तम व्यवस्था केली होती. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या समृद्ध परिसरात झालेल्या या कार्यक्रमास संकल्प न्यूजचे संपादक अशोक इथापे, मिलिंद इथापे आदींसह शाहीरप्रेमी मान्यवर व कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













