निश्चित ध्येयाची योग्य ‘दिशा’ -डॉ. प्रा. नितीन कदम सर
![]()
मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनो में जान होती है, पंखो से कुछ नहीं होता, होसलों से उड़ान होती है…!हा सुप्रसिद्ध उर्दू शेर ज्यांच्या जीवनप्रवासाशी जुळतो त्या निश्चित ध्येयाची योग्य दिशा दाखवणाऱ्या डॉ.प्रा.नितीन कदम सर यांच्या वाढदिवसा निमित्त सचिन ननावरे यांचा विशेष लेख..
काही माणसं खूपच खास असतात…त्यांच व्यक्तिमत्वच अस असत की जिथे जातात तिथे लोक आपलीशी करण्याची त्यांना नैसर्गिक देणगीच मिळालेली असते.. ते आले…त्यांनी पाहिले अन ते जिंकले…अशी अनुभूती डॉ.नितीन कदम सर यांच्याबाबत नियमित पणे नवनव्या ठिकाणी येत राहते..!

वाई शहरात विशेषत; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सोयी व सुविधा उपलब्ध करून आजच्या स्पर्धेच्या युगातील उच्चशिक्षित, सुसंस्कृत विद्यार्थी व देशाचा नागरिक घडविण्याचे कार्य डॉ. प्रा. नितीन कदम सर करत आहेत. म्हणूनच अलीकडच्या काळात दिशा परिवारातील शैक्षणिक संस्थांना महाराष्ट्रातील कोटा असे संबोधले जाऊ लागले आहे. यामागे त्यांची गेल्या १७ वर्षांची शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन संशोधनवृत्ती, धडपड व तपश्चर्या आहे.
सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात जन्मलेल्या सरांना शैक्षणिक वारसा घरातूनच मिळाला. विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि पुढे ग्रामीण भागातील शैक्षणिक चळवळ आणि त्याचे सामाजिक परिणाम या विषयावर त्यांच्या प्रबंधाला व शैक्षणिक उपक्रमाला दि ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कोलंबो (श्रीलंका) या विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी मिळाली.
आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विशेषत: ग्रामीण भागातील युवा पिढीला मिळावा म्हणून त्यांनी व त्यांच्या पत्नी प्रा. रुपाली कदम यांनी सन २००२ मध्ये कोचिंग क्लासेसच्या रुपाने सुरुवात केली. गेल्या १७ वर्षाच्या अथक परिश्रमातून आज सुमन एज्युकेशन सोसायटी संचालित दिशा स्टडी सेंटर, दिशा प्ले स्कूल, दिशा पब्लिक स्कूल, दिशा ज्युनिअर कॉलेज, दिशा एमपीएससी मार्गदर्शन केंद्र आणि दिशा ॲकॅडमी या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून प्ले स्कूल, लहान मुलांमध्ये शिक्षणाची आवड व त्यांचे कलागुण तसेच पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधे विविध शैक्षणिक प्रकल्प राबविल्याने दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची शैक्षणीक प्रगती होत आहे.
तर एमपीएससीच्या माध्यमातून मेगा भरती तलाठी, जिल्हा परिषद, पोलीस भरतीसाठी अनेक युवक युवतींना लाभ होत आहे. ॲकॅडमीद्वारे मेडिकल आणि इंजिनिअर क्षेत्रात अनेकांची निवड होत आहे, तर क्रॅश कोर्सच्या माध्यमातून दोन महिन्यात प्रवेश परीक्षांची तयारी केली जाते. विशेष म्हणजे मुलामुलींसाठी उत्तमरित्या निवासाची सोय केली आहे. नवी पिढी व उद्याचे देशाचे भवितव्य घडविणारे विद्यार्थी व नागरिक घडविण्याचे कार्य अविरत चालूू आहे. नुसते शैक्षणिक कार्यच नव्हे तर वाई शहराच्या सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात सरांचा मोठा सहभाग असतो.
वाईनगरीचे वैभव कृष्णा नदीपात्राच्या व घाटांच्या स्वच्छतेसाठी तसेच अनेक गरजू विद्यार्थी, रूग्णांना मदत मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार असतो. त्यांच्या या कार्याबाबत त्यांना माऊली जीवन गौरव, दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर ॲवार्ड, इंदिरा गांधी ग्लोबल अचिव्हमेंट ॲवार्ड, यंग इन्स्पिरिशन ॲवार्ड आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

दिशा परिवारातील शैक्षणिक संस्थांच्या कामगिरीमुळे वाई शहराची ख्याती देशभर पोहोचली आहे या यशामध्ये त्यांची आई, पत्नी प्रा. रुपाली कदम, सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व दिशा परिवारातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान मोठे आहे, असे ते आवर्जून व अभिमानाने सांगतात. वाईपासून जवळ असलेल्या केंजळ येथील माळरानावर भव्य एकत्रित शैक्षणिक संकुल उभारून विदयार्थ्यांना एकत्रित शिक्षणाची व निवासाची सोय करण्याचा संकल्प सरांनी सोडला आहे.
भरकटू पाहणाऱ्या तरुणाईला, विद्यार्थ्यांना ‘दिशा’ देणाऱ्या निगर्वी, प्रेमळ, नम्र, हरहुन्नरी, दिलखुलास, स्वच्छ मनाच्या डॉ.प्रा.नितीन कदम सर यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!
– सचिन ननावरे,बावधन ( टीम संकल्प )













