श्रीक्षेत्र भुईंजच्या श्रीमहालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव..! एक अलौकिक पर्वणी..!!
भुईंज: महेंद्रआबा जाधवराव
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जसा किरणोत्सव होतो, तसाच भुईंजच्या प्राचीन मंदिरातील महालक्ष्मीला किरणाभिषेक होतो याच अतिपवित्र क्षणी आज सोमवार दि. १८ मार्च रोजी दैनिक सकाळ माध्यम समुहाचे मुख्य व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांचे हस्ते श्री महालक्ष्मी देवीस अभिषेक करण्यात आला.
या मंदिराची सविस्तर खूप रंजक माहीती युवा लेखक, ऐतिहासिक व प्राचीन साहित्याचे अभ्यासक स्वप्नील महेंद्र जाधवराव यांनी वृत्तपत्रात व समाज माध्यमातून दिली आहे.
कृष्णेच्या काठी वसलेल्या, अध्यात्मिक महत्व असलेल्या, आचार्य भृगुऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुईंज नगरीत निसर्गाचा अद्भुत चमत्कार पहावयास मिळत आहे._
प्राचीन काळापासून भुईंज गावाला अनन्यसाधारण धार्मिक आणि अध्यात्मिक महत्व आहे. याला कारणही तसचं आहे.गावाला वरदान म्हणून लाभलेली दोन शक्तीस्थळं…
भारतात एकमेव भुईंज येथे आचार्य भृगुऋषींचे मंदिर आणि समाधी पहावयास मिळते.आजही या ठिकाणी भृगुऋषी जागृत अवस्थेत चिरनिद्रा घेत असल्याचे मानले जाते आणि दुसरे म्हणजे करवीरनिवासीनी महालक्ष्मीचं प्रती रूप मानले गेलेल्या महालक्ष्मीचे मंदिर.
दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला जाण्यासाठी दक्षिण भारतातून हजारो वैष्णव नाथपंथीय सांधूंचा जथ्था भुईंजच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येत असतो.गेल्या एक हजार वर्षांची ही अखंड परंपरा असून,तशा नोंदी देखील नाथ आखाड्याच्या महंतांकडे पहावयास मिळतात.यावरून देवीचे महात्म आपणास लक्षात येईल.
भुईंजच्या महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामावरून हे मंदिर अकराव्या शतकात राजा भोज याच्या काळात बांधले गेले असावं अशी माहिती मिळते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दगडात कोरलेल्या नाचणा-या मोराची आणि फुलांची प्रतिकृती दिसून येते. तसेच शिखरावर अनेक देवदेवतांच्या युद्धास सज्ज, तपस्वी, आशिर्वाद रूपी प्रतिकृती पहावयास मिळतात.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या उभारणीच्या कालखंडानंतर दुसरं प्राचीन महालक्ष्मीचं मंदिर भुईंज येथे बघायला मिळतं.त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ या देवीस करवीरनिवासीनीचं प्रतिरूप मानतात.
पूर्वीच्या काळी देवत्वाचा लाभ घेण्यासाठी भौगोलिक परिस्थिती पाहून देवाच्या इच्छेप्रमाणे मंदिरं बांधली जायची असं म्हणतात.देवत्व कायम जागृत राहिल्याने त्या काळी लोकांचे नवस, इच्छा- आकांक्षा हमखास पूर्ण होत असत.कोल्हापूरची महालक्ष्मी पश्चिममुखी आहे तर भुईंजची पूर्वाभिमुख आहे.कोल्हापूरला अस्ताला जाणारा सुर्य देवीला किरणांचा अभिषेक घालतो तर भुईंजला उदयास येणारा सुर्य…
सुर्य हे तेजतत्वाचे प्रकट रूप मानले आहे.आणि देवी ही सगुण तत्वांची जागृत शक्ती मानली आहे.किरणोत्सवाच्या काळात या दोन्ही तत्वांचं मिलन होऊन चैतन्यरूपी जागृत लहरी ब्रम्हांडात प्रक्षेपित होत असतात.या लहरी वातावरणातील वाईट असुरी शक्तींचा अंत करतात असं धर्मशास्त्र सांगते. किरणोत्सवाच्या वेळेत अनंत काळासाठी मूर्तीतील देवत्व हजारो पटीने कार्यान्वित होत असते.या जागृत लहरींचा तेथील संपूर्ण सजीवसृष्टीवर सकारात्मक परिणाम होत असतो.अशा या भुईंजच्या महालक्ष्मीचं महात्मचं अलौकिक आहे.
यावेळी श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट,भुईंज मा.विश्वस्त पत्रकार महेंद्रआबा जाधव सकाळ माध्यम समूह,साताराचे ऋषिकेश शेवते, विजय जगतापपत्रकार, वाई तालुका प्रतिनिधी भद्रेश भाटे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन पत्रकार विठ्ठल माने, दैनिक सकाळ ,भुईंजचे पत्रकार विलास साळुंखे. पुजारी दीपक धनवडे, आंबेकर काका व भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













