लगडवाडीच्या शेतकऱ्याने बांबू लागवडीतून शोधली प्रगतीची दिशा
![]()
सहा महिन्यात मिळाली 45 हजार रुपयांची मजुरी
वाई / प्रतिनिधी- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समितीच्या कृषी विभागातून शरद मोरे या लगडवाडी, ता. वाई येथील शेतकऱ्याने बांबू लागवड सुरू केली.
सदर योजनेमध्ये शेतकऱ्याला मजुरीच्या रूपाने सहा महिन्यांमध्ये 45 हजार रुपये इतकी मजुरी मिळाली असून त्यामध्ये शेतकऱ्याने खड्डे खोदणे, जागा सफाई करणे, सिंचन सुविधा करणे, लागवड करणे, निगा राखणे इत्यादी कामे केली आहेत.
या योजनेबाबत गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांचेकडून शासकीय स्तरातून मिळालेली माहिती अशी की, या योजनेतून एका हेक्टरसाठी सहा लाख 90 हजार रुपये इतके अनुदान असून तीन वर्षांचा संगोपनाचा खर्च शेतकऱ्यास प्राप्त होणार आहे.
नंतर संपूर्ण शेतामध्ये येणारे उत्पादन शेतकऱ्यांनी स्वतःकरता घेण्याचे आहे. ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी असून छोट्या- छोट्या शेतकऱ्यांनी किमान पाच ते दहा गुंठे या क्षेत्रावर लागवड केल्यास बांबू लागवडीपासून वर्षासाठी 40 ते 50 हजार रुपये इतके उत्पादन घेणे शेतकऱ्यास शक्य होणार आहे.

तरी मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये जमीन तयार करणे खड्डे खोदणे इत्यादी रोजगाराभिमुख कामे सुरू करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केले.
जून- जुलैमध्ये बांबूच्या प्रगत जातींची उदा. टूलडा, माणगा, मानवेल, मेशी इत्यादी बांबू लागवडीस योग्य अशा जातींची लागवड सुरू करावी, अशी माहिती कृषी अधिकारी शांताराम गोळे यांनी दिली आहे.
संबंधित पाहणीवेळी पंचायत समिती कृषी विभागाचे विस्तार अधिकारी अशोक भालेराव आणि पालक तांत्रिक अधिकारी राहुल बोराटे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर योजनेमध्ये शेतकऱ्यास रोपांचा पुरवठा जिल्हा परिषद मार्फत होणार असून खते आणि कीटकनाशके बुरशीनाशके इ साठीही तरतुद करण्यात आली आहे.













