वाईत पंचक्रोशी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
वाई ता.२६:- मराठी साहित्य संमेलनातील वेगवेगळ्या वैचारिक मंथनातून आपले हित कशात आहे, याची जाणीव होत असते. साहित्य हे माणसाला जगण्यासाठी प्रेरणा देते. साहित्याने जीवनात माणसाची नाती निर्माण केली. साहित्यामुळे माणूस स्वतःची संस्कृती तयार करू शकला. एवढेच नव्हे तर साहित्याने माणसाला विचार करायला शिकवलं. साहित्यिक जेव्हा समाजासाठी लिहितो, तेव्हा तो साहित्यिक त्याच्या कुटुंबाचा न राहता समाजाचा होतो. साहित्य हे कुटुंबाच्या सीमा ओलांडून पलीकडे जाते, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक शिरीष चिटणीस (सातारा) यांनी येथे व्यक्त केले.
येथील लो. टिळक स्मारक संस्था संचलित ग्रंथसंग्रहालयातर्फे आयोजित तिस-या पंचक्रोशी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेच्या रमेश गरवारे सभागृहात हे एकदिवसीय साहित्य सम्मेलन संपन्न झाले. संमेलनाचे अध्यक्ष श्री. चिटणीस यांनी बीजभाषणात मराठी भाषेची सद्यस्थिती, वाचक वर्ग, वाईच्या साहित्य क्षेत्रातील संस्कृत भाषेचा वारसा आणि वाचन संस्कृतीला बळ देणाऱ्या साहित्य संमेलन आयोजकांचे कौतुक केले.साहित्यातला वाचक हा महत्त्वाचा घटक आहे.यासाठी प्रेरणादायी ‘वाचक पुरस्कार पुरस्कार’ सुरू करण्याचे आवाहन केले.
यावेळी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त ‘रिंगाण’ कादंबरीचे लेखक प्रा. कृष्णात खोत यांनी विस्थापितांच्या जगण्याचं चित्र आपल्या शैलीत सडेतोडपणे मांडले. आज आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या कारणाने विस्थापित झालो आहोत. पुस्तकेच आपल्याला विचार करायला लावतात. असे ते म्हणाले. यावेळी नवोदित लेखक-कवी अजित क्षीरसागर, डॉ. शंतनु अभ्यंकर, श्रीमती कुलकर्णी, विलास पिसाळ, अमोल मांढरे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात ‘मी लिहिता का झालो?’ या परिसंवादात नाट्यलेखक जगन्नाथ शिंदे,लेखक डॉ.राजेन्द्र माने, लेखिका सिमंतिनी नूलकर,ऐतिहासिक कादंबरीकार ॲड. उमेश सणस आणि कवयित्री पूनम ससाणे यांनी अतिशय समर्पक शब्दात आपले विचार व्यक्त केले. प्रा. डॉ.चंद्रकांत कांबळे यांनी ‘ वाई परिसरातील साहित्य परंपरा ‘ तसेच
विश्वकोश कार्यालयातील सहसचिव जगतानंद भटकर यांनी ‘ मराठीच्या सहा बहिणी’ या या विषयात तमिळ, तेलगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम,आणि उडिया या अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषांच्या साहित्यांची वैशिष्ट्ये समजावून सांगितली.
साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी ‘ नियतकालिके आणि माध्यमक्रांती ‘ याविषयी विचार व्यक्त केले. अलिकडची नियतकालिके दर्पणाचे काम करतात पण त्यातून दिग्दर्शन होत नाही. ही स्थिती आता बदलण्याची गरज आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी आता नियतकालिकांनी जाणीवपूर्वक स्वीकारण्याची गरज आहे. पण ते स्वीकारत नाहीत, त्यामुळे ही मासिके रडतखडतच वाटचाल करतात. अन्य माध्यमांपेक्षा बरेच काही नियतकालिकांनी देणे गरजेचे आहे. नवीन माध्यमांचा उपयोग करून घेण्याचा नियतकालिके कंटाळा करीत असतात. यात बदल होऊन काळाची अनुकूलता नियतकालिकांनी स्वीकारली पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले.”
‘मी आणि माझी कादंबरी या विषयी बोलताना रावण कादंबरीचे लेखक शरद तांदळे यांनी आपला साहित्यिक प्रवास ग्राम्य शैलीत उलगडून दाखवला.सहज सुंदर आणि मनमोकळ्या शब्दात रावण कादंबरी कशी घडली यावर भाष्य केले. रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यामुळे बऱ्याच जणांना रावण कादंबरी वाचण्याची उत्सुकता लागली.
युवा लेखक प्रणव सखदेव यांची प्रकट मुलाखत डॉ.प्रशांत पोळ यांनी घेतली.
वाचन म्हणजे लेखनाचा रियाज.चांगलं सकस वाचलं तर नवीन सुचतं असा विचार दृढ करत लेखनाची मुशाफिरी प्रकट केली.त्यांनी “काळे करडे स्ट्रोक्स” या गाजलेल्या कादंबरीच्या कथानकावर शेअरिंग केले.
दुसऱ्या सत्रात आनंद पटवर्धन, सौ. सोनाली बंड, सुधीर सुर्यवंशी, गणेश सुबनावळ या वाचकांनी “मला आवडलेले पुस्तक” यावर विचार व्यक्त केले. स्वानुभावाचे कथन करत पुस्तक वाचण्याचे सूचित केले. वाईतील लेखक लक्ष्मीकांत रांजणे यांनी ‘हास्य चांदणे’ हा मिश्किली कार्यक्रम सादर केला. आपल्या भारदस्त आवाजात कथा, काव्य,पत्रवाचन आदी प्रकार सादर केले.अधूनमधून कोटस् पेरत हास्याची कारंजी चेहऱ्यावर फुलविली. सौ.ना लिहिलेल्या पत्र वाचनाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. तदनंतर काव्य आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना संमेलनाध्यक्ष शिरीष चिटणीस यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यात अध्यक्ष डॉ. शंतनू अभ्यंकर उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, सचिव भद्रेश भाटे, सहसचिव माया अभ्यंकर व संस्थेचे सर्व संचालक व सर्व विश्वस्त यांचा सहभाग होता. सौ. तनुजा इनामदार व आदित्य चौंडे यांनी सूत्र संचालन केले. डॉ. चिंतामणी केळकर यांनी समारोपात मान्यवरांचे व श्रोत्यांचे आभार मानले.
या संमलनाचे वेगळेपण म्हणजे रात्री झालेल्या ‘ काव्य रजनी ‘ कार्यक्रमात तालुक्याच्या परिसरातील आणि ग्रामीण भागातील कवी व लेखकांनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित क्षीरसागर व विलास पिसाळ यांनी केले. यावेळी पुस्तक प्रदर्शनास वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
………………………………………………………………………………..
– पंचक्रोशी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना साहित्यिक शिरीष चिटणीस, त्यावेळी उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, प्रणव सुखदेव, कृष्णा खोत, अध्यक्ष डॉ. शंतनू अभ्यंकर, विनोद शिरसाठ, कार्यवाह भद्रेश भाटे. छायाचित्र मनीष सोहनी, वाई













