साताऱ्यात महानाट्य, महाबळेश्वरात नाट्य संमेलन, वाईत साहित्य संमेलन
![]()
हा तर चुकवू नये असा कला, नाट्य, साहित्य उत्सव
– राहुल तांबोळी, भुईंज
कालपासून साताऱ्यात
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग सुरू झाले. ते आज आणि उद्याही संध्याकाळी जिल्हा परिषद मैदानावर होणार आहेत.
यंदा नाट्य संमेलनाने शतक महोत्सव साजरा केला म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी होत असलेल्या विभागीय नाट्य संमेलनापैकी एक आजपासून अ. भा. नाट्य परिषदेच्या वतीने महाबळेश्वरात ३ दिवस साजरे होत आहे. त्यात २ गाजत असलेल्या व्यावसायिक नाटकांसह इतर अनेक व स्थानिक कलावंतांचे विविध कार्यक्रम होत आहेत.

या कला, नाट्य उत्सवात भर पडत आहे ती वाईतील लो. टिळक ग्रंथालयाने रविवारी दि. २५ रोजी आयोजित केलेल्या पंचक्रोशी साहित्य संमेलनाची.
साताऱ्यात कालपासून सुरू झालेले ‘जाणता राजा’ महानाट्य, महाबळेश्वरात आजपासून सुरू होत असलेले विभागीय नाट्य संमेलन हे जेवढे भव्य तेवढेच दिमाखदार वाईत रविवारी होत असलेले एक दिवसीय पंचक्रोशी साहित्य संमेलन.
डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी महिन्याभरापूर्वीच पुण्यात एकत्र असताना वाईत भरवण्यात येणाऱ्या पंचक्रोशी साहित्य संमेलनाचे सूतोवाच केले होते. या उपक्रमात कार्यकर्ता म्हणून तू हवा आहेस असं बजावलं पण.
या संमेलनात सर्वांनी सहभागी व्हावे असं खूप तळमळीने वाटतंय.
या संमेलनात माझे प्रिय लेखक मित्र आणि नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला ते कृष्णात खोत आणि दुसरे लेखक मित्र शरद तांदळे यांचीही उपस्थिती इथं असणार आहे. यासोबत ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रणव सखदेव अशी दमदार नावं वाईतील संमेलनात हजेरी लावणार आहे.
प्रणवच्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ सह खोत यांची ‘झड-झिंबड’,
‘रिंगाण’, ‘रौंदाळा’,
गावठाण’, ‘धूळमाती’, ‘नांगरल्याविन भुई’ आणि तांदळे यांची ‘द आंत्रप्रन्युअर’, ‘रावण’ ही सर्व साहित्य संपदा वाचलेली, प्रचंड आवडलेली, संग्रही असलेली.
फारच ताकदीच्या या नव्या दमाच्या लेखकांसोबत स्थानिक लेखक, कवींच्या प्रतिभेचे रंग इथं उजळनार आहेत.

त्यामुळे आज, उद्या साताऱ्यात ‘जाणता राजा’ हे महानाट्य, आज, उद्या, परवा महाबळेश्वरात विभागीय नाट्य संमेलनातील दर्जेदार कार्यक्रमांचा आनंद ज्यांना ज्यांना लुटनं शक्य त्यांनी तो लुटावाच आणि रविवारी दि. २५ रोजी वाईत अफाट लेखकांच्या सहभागाने सजणाऱ्या पंचक्रोशी साहित्य संमेलनालाही नक्की यावे. आपली उपस्थिती संयोजक टिळक ग्रंथालयाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना असे उपक्रम राबविण्यासाठी बळ देईलच शिवाय आपलीही झोळी आनंदाने भरेल.
– राहुल तांबोळी, भुईंज
————————-













