शेतकऱ्यांना कमी किंमतीत ड्रोनसारखं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे – आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले.
![]()
शेतकऱ्यांना कमी किंमतीत ड्रोनसारखं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांसमोर त्याची प्रात्यक्षिके घेण्यात यावीत, असे प्रतिपादन आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भुईंज : महेंद्रआबा जाधवराव
सातारा तालुक्यातील डोंगरउंचावर वसलेल्या रेंवडे या गावात कृषी विभागाच्या वतीने नुकतेच ड्रोनच्या साह्याने खत फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भोसले, माजी पोलीस पाटील जयसिंग भोसले, ग्रामपंचायत महिला सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
ड्रोन फवारणी पाहाण्यासाठी गावातील शेतकऱ्यांसह आबालवृद्धांनी गर्दी केली होती. प्रात्यक्षिक पाहाताना प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर कुतूहल, उत्सुकता, अचंबा दिसत होता. उपस्थितांच्या मनात याविषयी कितीतरी प्रश्न, शंका होत्या. त्यांचे निरसन या वेळी संबंधित अधिकारी यांनी केले. या तंत्रज्ञानाचे फायदे स्पष्ट करण्यात आले.
शेतकऱ्यांना कमी किंमतीत ड्रोनसारखं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होण्यासाठी जोपर्यंत त्याची प्रात्यक्षिके अधिकाधिक शेतकऱ्यांसमोर घेतली जाणार नाही, तोपर्यंत शेतकरी ड्रोन तंत्रज्ञानापासून अनभिज्ञ राहण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करुन आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले ग्रामीण महिलांना उत्पन्नाच अतिरिक्त साधन आणि शेतकऱ्यांना कमी किंमतीत ड्रोनसारखं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या व ८ लाखाचे अनुदान मिळणा-या “नमो ड्रोन दीदी” योजनेचा फायदा सातारा जावली तालुक्यातील महिला बचत गटांनी घ्यावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा लाल किल्ल्यावरील त्यांच्या भाषणात महिलांना ड्रोन प्रशिक्षण देण्याबाबत घोषणा केली होती.
त्यानंतर पुढे नोव्हेंबर महिन्यात यासंबंधीच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि तिला नमो ‘ड्रोन दीदी’ असं नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत सरकार देशभरातल्या 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन वितरित करणार आहे.
त्यानंतर या महिला हे ड्रोन शेतकऱ्यांना शेती कामासाठी भाडेतत्त्वावर देऊ शकणार आहेत.
ड्रोनच्या सहाय्यानं खतं, कीटकनाशकांची फवारणी करण्याचं, तसेच शेतीतल्या वेगवेगळ्या कामांसाठी ड्रोनचा वापर कसा करायचा, याचे या बचत गटातल्या महिलांना 15 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ड्रोन दीदी योजनेअंतर्गत, ड्रोन आणि त्यासंबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80 % किंवा जास्तीस्त जास्त 8 लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे.
ड्रोनचा वापर आर्थिकदृष्ट्या जिथं शक्य असेल त्या भागातल्या महिला बचत गटांची आधी निवड केली जाईल आणि मग त्यांना ड्रोन पुरवले जातील. देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून एकूण 15 हजार बचत गटांना ड्रोन पुरवले जाणार आहेत.2024 ते 2026 या कालावधीत महिलांना ड्रोन पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.













