आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेमुळे अस्वलाच्या हल्ल्यातील जखमींना मिळाली १० लाखाची मदत
भुईंज। महेंद्र जाधव
सातारा तालुक्यातील झुंगटी आणि केळवली येथील दोन ग्रामस्थ अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाले होते. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे या दोन्ही जखमी ग्रामस्थांना वन विभागाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत मिळाली आहे.
झुंगटी येथील संतोष लक्ष्मण कोकरे वय ४२ आणि केळवली येथील शंकर दादू जानकर वय ५३ हे दोघे दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी झुंगटी येथून कारगावकडे चालत निघाले होते. रस्त्यात दुपारी १ च्या सुमारास एका अस्वलाने त्या दोघांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी या दोघांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी वन विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या दोघांनाही वन विभागाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये मदत मिळाली.
मदतीचा धनादेश आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते या दोघांना सुपूर्त करण्यात आला. यावेळी साताराचे वन क्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, रोहोटचे वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक सुनील शेलार, अंकुश कोकरे, सुरेश माने, रामचंद्र अवकीरकर, बाबुराव कोकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.













