Thu, Jan 15, 2026
Finance सहकार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रेरणा बँकेचा रौप्य महोत्सवी सांगता समारंभ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रेरणा बँकेचा रौप्य महोत्सवी सांगता समारंभ
Ashok Ithape
  • PublishedFebruary 12, 2024

सहकारी बँकांनी विकास आणि विस्तारासोबत ग्राहक हित जपावे – अजित पवार

पुणे दि.११: सहकारी बँकेच्या संचालकांनी जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, ठेवीदार, सभासद, कर्जदार, विद्यार्थी यांच्या उन्नतीसाठी त्यांच्या हिताचे निर्णय घावेत. बँक शाखांची, ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. पारदर्शक कामे करून ग्राहकांचे हित जोपासावे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

प्रेरणा को-ऑप बँकेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते. ताथवडे येथे आयोजित या कार्यक्रमाला माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणे, नाना काटे, बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर, व्हाईस चेअरमन श्रीधर वाल्हेकर, संस्थापक संचालक तुकाराम गुजर, बँकेचे संचालक, सभासद आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, महाराष्ट्रात सहकारी चळवळीच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या असून अनेक संस्था नावारूपास आल्या आहेत. त्यापैकी एक असलेल्या प्रेरणा को-ऑप. बँकेची २५ वर्षांपासून प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. बँकेने आर्थिक प्रगती साधत सक्षम बँक म्हणून ओळख निर्माण केली आहे.

काही सहकारी बँका संचालक मंडळाच्या व व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे अडचणीत येतात. त्यामुळे सहकार क्षेत्र बदनाम होत असते. संचालक मंडळानी संस्था चांगल्यारीतीने चालवल्या पाहिजेत. ग्राहकांना चांगली सेवा द्यावी. अधिकारी कर्मचारी यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सहकारी बँकांना ५ लाख रुपयांपर्यंत विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. पत संस्थानाही १ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. संस्थेने ग्राहकांच्या हिताच्यादृष्टीने निर्णय घ्यावेत. इंटरनेटमुळे आर्थिक व्यवहार अतिशय सोपे झाले आहेत. यूपीआय व्यवहारावर कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. केंद्र शासनाने यूपीआय प्रणाली वापराला प्रोत्साहित करण्यासाठी नुकतेच काही बदल केले आहेत. बँकेने त्याची माहिती ग्राहकांना द्यावी, असेही श्री.पवार म्हणाले.

प्रास्ताविकात कांतीलाल गुजर यांनी बँकेच्या प्रगतीविषयी माहिती दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते उत्कृष्ठ काम करण्याऱ्या बँकेच्या सहा अधिकाऱ्यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!