जेष्ठ नेते उल्हासदादा पवार यांचा खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते, मदनदादा भोसले यांच्या उपस्थितीत सोमवारी भुईंजमध्ये मानपत्र प्रदान करून गौरव
![]()
आज शिवार गप्पा.. उद्या शब्द सुमनांचा उत्सव..!
राहुल तांबोळी, भुईंज :
भुईंज येथे कृष्णेकाठी सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने भक्तिरसाला उधाण आले आहे. याच निमित्ताने कृष्णाकाठचे ज्ञानसत्र या व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या अपार प्रतिसादात आज रविवारी शिवारगप्पा ही आपल्याच ग्रामीण भागातील नवोदित युवा साहित्यिकांची इथल्याच मातीचा गंध असणारी अनोखी मैफल जमत असताना उद्या सोमवारी दुपारी 3 वाजता याच ठिकाणी अक्षरशः एक अलौकिक सोहळा संपन्न होत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, वक्ता सहस्त्रेदषु, वारकरी सांप्रदायाची पताका आपल्या आचार, विचारातून दिमाखाने उंचावणारे, कला, साहित्य क्षेत्रात आपल्या रसिकतेने अफाट मुशाफिरी करणारे, गुनिजन, अभिजनांच्या मांदियाळीत सदैव शोभुन दिसणारे आदरणीय उल्हासदादा पवार यांचा विशेष सन्मान होत आहे.
हा सन्मान तितक्याच तोलामोलाच्या अशा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होत असल्याने ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे त्या मठाशेजारून वाहणारी कृष्णामाई या सोहळ्याचं अलौकीक रूप पाहण्यासाठी क्षणभर थबकली तर आश्चर्य वाटू नये.
उल्हासदादांचे स्नेही मदनदादा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यात भुईंजमधील गुणवंत, कर्तबगारांचा सन्मान होणार आहे.
उल्हासदादांचा व्यासंग अफाट, कर्तृत्व अफाट, विविध क्षेत्रातील दिग्गजांशी स्नेह अफाट. मुख्यमंत्रीपद अगदी दाराशी येऊन परतले पण त्यांच्या जीवनातील उल्हास तसूभर कमी झाला नाही, की चेहऱ्यावरील हास्य किंचितसे कधी लोपले नाही. जेवढया फर्डेपणाने राजकीय सभा त्यांनी गाजवल्या तेवढयाच व्यासंगाने पंडित भीमसेन जोशी यांच्या मैफिलीचे सूत्रसंचालन केले. जेवढया तन्मयतेने प्रवचन, कीर्तनात हजेरी लावली तेवढ्याच आत्मीयतेने तमाशाला हजेरी लावली. काँग्रेस पक्षाचा कोष असणाऱ्या उल्हासदादांच्या गाठीशी राजकीय पदांपेक्षा विविध क्षेत्रातील रसिक व्यासंगाचा समृद्ध ठेवा आहे. त्याची भुरळ, त्याचे अप्रूप भल्याभल्याना. त्या अप्रुपातून, त्यांच्याशी असणाऱ्या अपार स्नेहातून खासदार श्रीनिवास पाटील हे आपल्या या मित्राच्या सन्मानासाठी आवर्जून येत आहेत.
या सोहळ्यात उल्हासदादांना पारायण मंडळ आणि भुईंज प्रेस क्लबतर्फे मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
रामदासबापू जाधव, जयवंत पिसाळ, पारायण मंडळ, भुईंज प्रेस क्लब यांच्या नियोजनातून होणारा हा कार्यक्रम म्हणचे आयुष्यभर मनाच्या कुपीत जपुन ठेवावी अशी ठेव असणार आहे. हा समृद्ध करणारा ठेवा मर्मबंधातील ठेव म्हणून जपून ठेवण्यासाठी रसिकांना, गुणिजनांना, अभ्यासूना, विचारांचं सोनं लुटण्यासाठी उत्सुक असणाऱ्या उत्सुकांना, सहृदयांना आग्रहाचं निमंत्रण.













