Mon, Mar 2, 2026
शिक्षण स्थानिक बातम्या

तिरंगाच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी जिंकली मने मनोवेधक सादरीकरणासह मान्यवरांचे लाभले मार्गदर्शन

तिरंगाच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी जिंकली मने मनोवेधक सादरीकरणासह मान्यवरांचे लाभले मार्गदर्शन
Ashok Ithape
  • PublishedFebruary 10, 2024

भुईंंज : रामायणावर आधारीत महानाट्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मनोवेधकपणे साकारुन पाचवड, ता. वाई येथील तिरंगा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्वच उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे दोन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनास हजारो पालक, ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

तिरंगा एज्युकेशन सोसायटीच्या तिरंगा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या मैदानावर सलग दोन दिवस पार पडले. पहिल्या दिवशी हिताची या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तथा गिर्यारोहक, सायकलपटू, धावपटू आणि पुणे येथील वीर सावरकर मंडळाचे विश्‍वस्त श्रीकांत मापारी, हिताची कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुनिल लोखंडे, सरपंच महेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्रीकांत मापारी यांनी विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेतानाच सामाजिक भानही रुजवले पाहिजे असे सांगून सामाजिक भान जपताना अत्यंत छोट्या गोष्टीतून आपण राष्ट्रसेवेचे, समाजसेवेचे काम करु शकतो असे सांगितले.

तर सुनिल लोखंडे यांनी तिरंगाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाविष्काराचे कौतुक करुन तिरंगा इंग्लिश स्कूल परिसरात साकारलेली राजेश स्वामी अभ्यासिका या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण ठरेल असे सांगितले.

दुसर्‍या दिवशी झालेल्या स्नेहसंमेलनात जलसंपदा विभागाच्या गुण नियंत्रक अधिकारी गुंजन करांडे जाधव यांनी, सद्यस्थितीत सर्वच क्षेत्रात ग्रामीण भागातील गुणवत्ताच झळकत असल्याचे सांगून त्यामध्ये तिरंगाचे विद्यार्थीही आपले मौल्यवान योगदान देतील असा विश्‍वास व्यक्‍त केला. उपसरपंच अजित शेवाळे यांनी स्व. नारायणराव पवार यांच्या शिस्तीत तिरंगा परिवाराचे विविध क्षेत्रात सुरु असणारे कार्य महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता गायकवाड, सचिव जयवंत पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका सौ. वैशाली कुंभार यांनी अहवाल वाचन केले. आशिष बनसोडे, मनिषा पोळ यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या सौ. वनिता पवार यांनी आभार मानले.

यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने अक्षय चव्हाण, विजया पवार यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पाहुण्यांनी आयएफएस राजेश स्वामी अभ्यासिकेस भेट दिली. तर श्रीकांत मापारी यांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास संजय मोरे, प्रविण चव्हाण यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!