Wed, Feb 25, 2026
राजकीय बातमीपत्र

लिंब गावातील युवा वर्ग एकसंघपणे गावच्या विकासासाठी कार्यरत असल्याचे पाहून मनस्वी आनंद वाटला, असे प्रतिपादन आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

लिंब गावातील युवा वर्ग एकसंघपणे गावच्या विकासासाठी कार्यरत असल्याचे पाहून मनस्वी आनंद वाटला, असे प्रतिपादन आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
Ashok Ithape
  • PublishedFebruary 10, 2024

भुईंज । महेंद्रआबा जाधव :

लिंब ता. सातारा येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आवास योजनेतून कातकरी समाजबांधवांना १५ घरांचे लोकार्पण, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत लिंब गावासाठी १३.५० कोटींची पाणीपुरवठा योजना, त्यातील मुख्य पाण्याची टाकी आणि जलशुद्धीकरण केंद्राचे भूमिपूजन आणि १५ व्या वित्त आयोग आणि ग्रामनिधी यामधून ग्रामपंचायत सुसज्ज फर्निचर कार्यालयाचे उद्घाटन आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.

यावेळी जेष्ठ नेते, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत, लिंबचे सरपंच ऍड. अनिल सोनमळे, लिंब सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील, अजिंक्य विकास सेवा सोसायटी चेअरमन मारुती सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, पंचायत समितीच्या माजी सभापती सरिता इंदलकर, माजी उपसभापती दादा शेळके, राहुल शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, स्व. भाऊसाहेब महाराज आणि लिंब गावचा फार मोठा जुना ऋणानुबंध आहे. येथील ग्रामस्थांनी आम्हाला भरभरून दिले तर, हे गाव मतदारसंघात असो वा नसो या गावच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहिलो. विकासकामे करताना लिंब गावाला नेहमीच झुकते माप दिले आहे. गावच्या विरोधात वेगळी भूमिका घेणाऱ्या अनेकांना ग्रामस्थांनी धडा शिकवला आहे. शेवटी जो विकासकामे करतो, लोकांचे प्रश्न मार्गी लावतो त्याच्याच पाठीशी उभे राहिले पाहिजे.

गावचे युवानेते जितेंद्र सावंत हे आजारपणातून लवकर बरे होतील आणि समाजकारणात पुन्हा सक्रिय होतील, अशी कोटेश्वराकडे प्रार्थना करतो. गावातील युवा वर्ग एकसंघपणे गावच्या विकासासाठी कार्यरत आहे, हे पाहून आनंद वाटला. या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कधीच कमी पडलो नाही. सातत्याने भरीव निधी उपलब्ध करून या गावातील प्रत्येक भागातील विविध प्रश्न सोडवले आहेत. यापुढेही लिंब गावच्या समस्या सोडविण्यासाठी कायम प्राधान्य राहील अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना दिली.

सरपंच ऍड. अनिल सोनमळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास महादेव धोत्रे, धर्मेंद्र सावंत, बिपिन सावंत, गोव्याचे सरपंच विवेक जाधव, वरंगळचे सरपंच किरण साळुंखे, वर्येचे माजी सरपंच नवनाथ ननावरे, कुशीचे सरपंच जितेंद्र सावंत कळंबे गावचे सरपंच ऍड. इंदलकर, बसाप्पाचीवाडीचे सरपंच सुनील शिंदे, धावडशीचे प्रभाकर पवार, किडगावचे सुरेश टिळेकर, ज्ञानदेव सोनमळे गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!