Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा

दुःखाची ही जखम कायम भळभळत राहील..स्व.श्रीमंत छ.अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…

दुःखाची ही जखम कायम भळभळत राहील..स्व.श्रीमंत छ.अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…
Ashok Ithape
  • PublishedFebruary 3, 2024

दिव्यस्पर्शी, स्व.भाऊसाहेब महाराज रोज तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एक स्वामीनिष्ठ सेवक महेंद्र जाधव (आबा) भुईंज ता.वाई जि. सातारा

दुःखाची ही जखम कायम भळभळत राहील..

आयुष्यात मी खूप काही पाहिलं, अनुभवलं आणि भोगलं देखील. या भोगण्यातील स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोंसले तथा भाऊसाहेब महाराजसाहेब याचं आपल्यातून अकस्मित निघून जाणं ज्या तऱ्हेनं मला भोगावं लागलं तो भोग सर्वात वेदनादायी होता…
मुळातच मी लहानपणापासून भुईंज व वाई तालुक्यातील साऱ्या सत्ता आभूषणांना मी फार जवळून पाहिलंय त्यामुळं राजकीय पदाधिकारी, नेत्यांचं मला कधीच अप्रूप वाटलं नाही. असे असताना भाऊसाहेब महाराज मात्र भावले ते राजा मनाचा राजा माणूस म्हणून. राजघराण्यातील असूनही ते कायम सर्वसामांन्याशी त्यांच्यातील एक म्हणूनच राहिले.
सन २००० साली नगर पालिका निवडणूक प्रसिध्दी साठी त्यांनी स्वत: बोलावणे धाडले होते.. महिनाभराचे ते एक कॉन्ट्रॅक्टच.. पण काम करण्याची हातोटी, प्रामाणिकपणा पाहून नगर पालिका निवडणूकीचा निकाल विरोधात जाऊनही मला पुन्हा काम करण्याची संधी दिली..
नुसती संधीच नाही तर एक विश्वासू सेवक म्हणून ते कायम मला सोबत नेत असत.. त्यांच्या बरोबर राहिल्याने भाऊसाहेब महाराज मला कळाले.. अहोरात्र जनसामान्यासाठी झटणारे.. राजे असूनही राजेपण कधीही न मिरवणारे.. माणसातील देवमाणूस मला जवळून पाहता आला..

दिव्यस्पर्शी…
भाऊसाहेब महाराज यांचा दिव्यस्पर्श मला लाभला आणि अवघ्या आयुष्याचं सोनं झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघरण्यात जन्म झाला आणि शिवरायां प्रमाणेच तेही हयातभर सर्वसामान्यासाठी चंदनाप्रमाणे झिजले. ते राजकारणात दाखल झाल्यावर सातारच्या जनतेला आपला हक्काचं दमदार मात्र अत्यंत संयमी, निर्गवी नेतृत्व लाभले. कोणीही अगदी लहाना पासून थोरापर्यंत त्यांना थेट भेटू शकत होतं आणि बोलू शकत होतं. प्रत्येकाशी अहोजाओ बोलून ते प्रत्येकाला आपलेसे कधी करीत ते कळतही नसे. राग, संताप, चीड हे शब्दच त्यांच्या शब्दकोषात नव्हते. लाखो जनांचे जगने सुंदर करणारे महाराज आज नाहीत हे मानायला मन आजही तयार होत नाही एवढ्या त्यांच्या अनंत स्मृति मनात आजही चिरंतन आहेत…!

मी कमनशीबी..
केवळ चार वर्षाचा सहवास.. पण या चार वर्षात खुप काही शिकायला मिळाले.. भाऊसाहेब महाराजांची गुणवैशिष्टे जवळून पाहिली. ते खुश असले की सारा सुरुची वाडा मोहरून जायचा, पण ते कधी दुःखी असले तर कधी कुणाला जाणवुनही द्यायचे नाहीत.

सुख माझं सुख माझं
हंड्या झुंबर टांगलं
दुःख माझं दुःख माझं
काळकोठरीत डांबलं

बहिणाबाईंच्या या ओळींप्रमाणे त्यांची वर्तणूक होती. त्यांनी व श्रीमंत छ. अरुणाराजे भोसले तथा थोरल्या वहिणीसाहेबानी पुत्रवत प्रेम केले. त्यांच्या सहवासात आयुष्यात धन्य झालो या भावनेच्या हिंदोळ्यावर झुलत असतानाच क्रूर नियतीने माझ्या झोक्याची दोर कापली.
अचानक स्वादुपिंडाचा विकार जडल्याने सातारा येथून पुण्याला त्यांना हलवले.. मी पहायला गेलो तेंव्हा जवळ बोलावले व म्हणाले महेंदआबा तुम्ही सातारला जावून सुरूचीवर थांबा.. मी लवकर बरा होवून येतोय हे सर्वांना सांगा..
पण ते परत आले नाहीत

४ फेब्रुवारी २००४ ला प्राणज्याेत मालवली. त्यावेळीही मी सोबत होतो. महाराज हे शब्द पाळणारे होते. पण, “मी परत येतोय” हा मला दिलेला शब्द मात्र त्यांनी का पाळला नाही? या प्रश्नाने मन नेहमीच आक्रंदून जातंय, दुःखाची ही जखम कायम भळभळत राहिलीय. केवळ जयंती, पुण्यतिथीलाच नव्हे तर रोज तुमची आठवण आल्याशिवाय रहात नाही..

स्व.श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज  तुमच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…

एक स्वामीनिष्ठ सेवक
पत्रकार महेंद्र जाधव ( आबा )
भुईंज ता.वाई जि. सातारा

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!