Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र सामाजिक

“जरांगे पाटलांच्या अभूतपूर्व आणि चित्तथरारक लढ्याची होणार इतिहासात नोंद”…!

“जरांगे पाटलांच्या अभूतपूर्व आणि चित्तथरारक लढ्याची होणार इतिहासात नोंद”…!
Ashok Ithape
  • PublishedJanuary 26, 2024

जरांगे-पाटील यांचा जयघोष करण्यासाठी आणि आरक्षणाच्या विजयोत्सवसाठी गुलालाची आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मराठ्यांनो व्हा सज्ज..!

भुईंज । महेंद्रआबा जाधव :

मनोज जरांगे पाटील… अभ्यासक्रमा बाहेरचा प्रश्न!
दृश्यम चित्रपटात एका चौथी पास व्यक्तीला सिस्टीम गृहीत धरते आणि आपल्या कुटुंबासाठी तो व्यक्ती अख्ख्या सिस्टीमच्या विरोधात उभा राहतो! असाच एक ‘मराठ्यांचा ‘कुटुंबप्रमुख’ आज आपल्या कुटुंबासाठी सगळ्या शक्यता मोडून काढण्यासाठी, आपल्या घरासाठी शक्य होईल ती प्रत्येक गोष्ट करण्यासाठी सिस्टीम विरोधात उभा ठाकला आहे!

एकदा जरांगे पाटील म्हणाले होते की, ‘मी पुस्तक बिस्तक वाचत नाही’. तेवढ्याच गोष्टीवर इथल्या अभ्यासू व्यवस्थेने आणि लोकांनी त्यांना गृहीत धरलं! त्यांचं दिसणं, राहाणं, केसांची ठेवण, बोलणं, खासकरून हिंदी भाषा… एका नेतृत्वात दिसावं असं काहीच नाही आणि हा माणूस बलाढ्य व्यवस्थेला आव्हान देणार? सहा महिन्यांपूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल…

कधी कधी चित्रपटापेक्षाही किंवा कल्पनेपेक्षाही सत्य जास्त प्रखर आणि स्पष्ट असतं! निष्ठा आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सगळ्यांचे सगळेच अंदाज मोडीत काढत, कोटी लोकांचं शिष्टमंडळ घेऊन हा माणूस आज मुंबईच्या दिशेनं निघाला आहे!

जेव्हा हा माणूस मुंबईला निघताना सोबत घ्यायची सामानाची यादी सांगत होता तेव्हा लोकांनी शाळेच्या सहलीला निघायची तयारी म्हणून विनोद केले होते… आज ही ५० किलोमीटर लोकांची रांग बघून त्या तयारीचं महत्त्व आत्ता कळत आहे! प्रत्येक गोष्टीत फार लांबचा विचार केलेला आहे.

एवढा प्रवास, आधीच तब्येत साधारण, दोन तीन तासांची झोप, सतत लोकांशी बोलणं… प्रचंड थकवा येत असेलच! कितीही उर्जा असली तरी शरीराला मर्यादा असतात. आपल्याला आपल्या कुटुंबप्रमुखाची काळजी घ्यावी लागेल…

हा माणूस अशा पद्धतीने मुंबईपर्यंत येईल हा कोणी विचारही केला नव्हता. आता सर्वांनाच प्रश्न पडला आहे की या सगळ्या गोष्टींचा परिणाम पुढे काय होईल? खरंतर यासाठी कोणीच तयार नव्हतं. सर्वसामान्य लोक, शासन, प्रशासन सगळयांनीच आजवर वर्षानुवर्ष वेगळ्याच प्रश्नांची तयारी केली होती. असा माणूस अशा पद्धतीने कधी पुढे येईल हा विचार कोणी केला नाही. हा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न कसा सोडवायचा?

बारावी शिकलेला गावाकडचा एक फाटका माणूस करून करून काय करणार? सुरूवातीला सगळ्यांनीच गृहीत धरलं! आज तोच माणूस कोटी लोकांच्या अपेक्षांची जबाबदारी खांद्यावर घेऊन उभा ठाकला आहे! आपल्या कुटुंबासाठी शक्य होईल ती प्रत्येक गोष्ट करतो आहे!

छत्रपती शिवाजी महाराज पाठीशी आहेत… जणू काही त्यांच्याच नेतृत्वाखाली ही मोहीम नवी मुंबई पर्यत पोहचली आहे! ती मुंबईतील आझाद मैदानावर पोहचून आरक्षण घेऊनच तेथून निघेल यात तिळमात्र शंका नाही.

जयस्तु मराठा..

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!