राजधानी सातारा येथून मावळ्यांची फौज मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना
![]()
राजधानी सातारा येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मावळ्यांची फौज मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना
भुईंज । महेंद्रआबा जाधव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं आंदोलनं, उपोषणं करणारे मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. २६ जानेवारीला मुंबईत मनोज जरांगे आमरण उपोषण करणार आहेत. जालन्यातील त्यांच्या अंतरवाली सराटी या गावातून निघतानाच त्यांनी तसा इशारा दिला होता.
मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होऊन ढिम्म शासनाला जागे करण्यासाठी सातारा येथील मराठा सकल समाजातील मराठा बंधू-भगिनी यांनी ढोल ताशांच्या निनादात आणि एक मराठा कोटी मराठा च्या जयघोषात शिवतीर्थावर जावून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. यानंतर ‘आरक्षण घेतल्या शिवाय माघार नाही’ असा निर्धार करीत लाखो मावळ्यांनी मुंबईच्या दिशेने कुच केली.













