Mon, Mar 2, 2026
सामाजिक

चिंधवलीचे मोरे कुटुंबीय आजही जगतायत समाधानाचे आयुष्य…!

चिंधवलीचे मोरे कुटुंबीय आजही जगतायत समाधानाचे आयुष्य…!
Ashok Ithape
  • PublishedJanuary 23, 2024

पूर्वाश्रमात अनेकांना दिले जलअमृत, आज नव्वदी पार करूनही इतरांना देतायत स्वावलंबनाचे धडे.

पाचवड l दिपक पवार :

तब्बल दहा दशकं आता पूर्ण होतील पण ते तसूभरही मागे सरले नाहीत, तर ते आजही जगतायत समाधानाने आणि तितक्याच आनंदाने.

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा तो आला नि गेला काय, त्यांच्या मनावर त्याचा काहीच फरक पडत नाही,
तर फरक पडतोय त्या क्षण क्षण वेळेला.

कधी मिळालेच वर्तमानपत्र तर उघड्या डोळ्यांनी वाचतील, तर कधी दुकानातील किराणा सामान आणायला पोहोचतील, तर कधी सरपण संपलय म्हणून गोळा करून मोळीभर आणायला जातील, तर दररोज न चुकता नळावरून घाघरीने पाणी भरतील, पण हे सगळं सातत्य राखूनच.

मु.पो.चिंधवली ता.वाई, जि.सातारा कृष्णामाईच्या सहवासात नांदणारं छोटसं सर्वगुणसंपन्न गाव. सर्वगुणसंपन्न म्हणजेच कृष्णामाईचा सहवास, ग्रामदैवत श्री नवलाई देवीचे आशीर्वाद, हाकेच्या अंतरावरून जाणारा पुणे-बॅंगलोर हायवे, पूर्वेकडे असणारी साखर फॅक्टरी, उत्तरेस भृग ऋषींची समाधी म्हणून ओळखले जाणारे भुईंज गाव,

महाबळेश्वर पाचगणीची नकळत येणारी थंडगार वाऱ्याची झुळूक,
दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणारी वाई आणि महागणपती म्हणून प्रसिद्ध असणारा वाई तालुका आणि
मराठ्यांची राजधानी म्हणून लाभलेला सातारा जिल्हा म्हणूनच एवढ्या सगळ्या देखणेपणात वसलेलं चिंधवली गाव.
पण
चिंधवली गावात आजही जुणे जाणते ज्ञानी, बुजुर्ग, जेष्ठ नागरिक पहायला मिळतात, आपल्या कर्तबगारीने म्हणा किंवा दूरदृष्टी प्रामाणिक साधेपणातून आपलं आनंददायी जीवन आजही तितक्याच उत्साहाने आणि इतरांना लाजवेल इतक्या बेभानपणे जगत आहेत, वाढवत आहेत आणि शिकवत आहेत.

काळाची परिस्थिती जशी बदलत चालली तशी अनेकांच्या वाटचालीत तितकाच आपसूकच बदल होत गेला, पण मोरे कुटुंबीय म्हणजेच श्री किसन मल्हारी मोरे आणि सौ. सुभद्रा किसन मोरे हे दोघे पती-पत्नी आजही आपलं सातत्य राखण्यात तसूभरही मागे सरले नाहीत.

पूर्वाश्रमात तहानभूक हरवून कष्ट करणे एवढेच माहीत होते, मग परिस्थिती किती हालाखीची किंवा किती संघर्ष करायला लावते, याचा मागचा पुढचा विचार न करता कोंबडं आरवल्यापासून ते रातकिड्यांची किर्र सुरू होईपर्यंत नुसते कष्टच उपसले. कधी पोटाला चिमटा घेत तर कधी नुसतेच पाणी पिऊन पोटाला आधार देत हातातलं शरिरापेक्षा डोईजड ओझं पुढं सरकवले.

जुण्या काळातील लग्नसराई तशी आगळीवेगळीच म्हणायची, आता तशी पहायला मिळाली तर कुतूहलच.

ज्यांच्या घरी लग्नसराई, त्यांच्या घरी लग्नाच्या आदल्या दिवशी वऱ्हाड बैलगाडीतून सर्व लवाजम्यासह मुक्कामावर, मग काय आहेतच मोरे कुटुंबीय त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी, अंघोळीपासून ते जेवणासाठी लागणारे सर्वच पाणी कृष्णानदीतून कावडीच्या साह्याने त्या लगीन घरी वऱ्हाड पुन्हा जाईपर्यंत, आणि जितके लागेल तितके पाणी पुरवण्याची जबाबदारी या मोरे कुटुंबीयांवर असायची, अगदी नवरदेवाच्या घोड्यांचे पायधुणे (पूजन) करण्यापर्यंत सर्व पाण्याची जबाबदारी घ्यायची, मग त्या बदल्यात कोण धान्य देईल तर कोण जेवण देईल तर पैसे देईल.

वैशाख महिन्यात ग्रामदेवतेची यात्रा आणि उन्हाळी सुट्टी यासाठी कामानिमित्त परगावी असणारी मंडळी गावाकडे यायची त्याकाळी ज्या ज्या कुटुंबीयांना घरगुती कामासाठी जेवढे पाणी लागेल तितके पाणी पुरवण्याची व्यवस्था मोरे कुटुंबीय करत होते त्या बदल्यात महिन्याकाठी त्यांना पाच-दहा रुपये मिळत होते.

इतरवेळी कुणाच्या शेताला, परड्याला किंवा अंगणाभोवती जर काटेरी कुंपण करायचे असेल तर मोरेभाऊ आणि रोडेबाबा ते कुंपण इतके भारी गुंफायचे की कोंबडीचे पिल्लू सुद्धा आतबाहेर करणार नाही, इतकं देखणे, नक्षीदार आणि एका रेषेत बघण्याजोगे कुंपण तयार करायची आणि
त्याचजोडीला चावडीमध्ये कोतवालीचे कामेसुद्धा तितकीच नेटाने केली म्हणूनच आज नऊ दशकाच्या कालखंडातले किसनभाऊ तितक्याच उत्साहाने, आवडीने वर्तमानपत्र वाचतात आणि ते सुद्धा बिना चष्म्याने.

चार-पाच मुलांचा सांभाळ करून प्रत्येकजण आता आपापल्या संसारात व्यस्त आहेत.
प्रचंड उर्जेपुढे आजारपणं त्यांच्या जवळपास घोंघावत ही नाही आणि पाचवड, भुईंज सारख्या बाजारपेठेत जाताना आजही ते चालत जातात.

त्याहीपुढे आजही चूलीला लागणारे सरपण रानातून गोळा करून, तितकीच भारदस्त मोळी आजही या वयात रानातून पाठीवर घेऊन येतात, रोज न चुकता हंड्याने पाणी भरणे, कोंबडं आरवतेय ना आरवतय तोच चूल पेटवणे आणि न राहवून संसारातल्या साहित्याची जुळवाजुळव करणं हे त्यांच्यासाठी नित्याचेच होऊन बसले असले तरी आजही ते समाधानाचे आयुष्य जगतायत,
पण या समाधानी, आनंददायी वाटचालीला किंचीतसी कौतुकाची थाप मिळाली तर किती बरे होईल.

भुईंज l दिपक पवा

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!