प्रा. मे. पुं रेगे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वाईत विविध कार्यक्रमांचे आयोजन
वाई l दि. २२
प्राज्ञपाठशाळामंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष व ज्येष्ठ तत्त्वज्ञ प्रा. मे. पुं. रेगे यांचा जन्मशताब्दी सोहळा संस्थेने वाई येथे आयोजित केला असून त्या निमित्त विविध ग्रंथांचे व प्रा. रेगे स्मृतिविशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. हा कार्यक्रम वाई येथील टिळक स्मारक संस्थेच्या रमेश गरवारे सभागृहात बुधवार दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६-३० वाजता संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून इंग्लिश भाषा व साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. मिलिंद मालशे हे ‘रेगेसर, आधुनिकता आणि परंपरा’ या विषयावर आपले मत व्यक्त करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सरोजा भाटे या आहेत. किरण रेगे (अमेरिका) यांनी रेगे सरांच्या ‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक
परिवर्तन’ या पुस्तकाचे इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केले असून याचवेळी या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी एस. डी. इनामदार यांनी लिहिलेल्या ‘भाषा-साहित्य चिंतन’ या आणि प्रा. रेगे यांच्या संबंधातील अनेक आठवणींच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ‘नवभारत’ या मासिकाचा ‘रेगे जन्मशताब्दी विशेषांक’ प्रकशित होणार आहे.













