Mon, Mar 2, 2026
सामाजिक

माहेश्‍वरी फौंडेशनचा अन्नदानाचा अविरत यज्ञ

माहेश्‍वरी फौंडेशनचा अन्नदानाचा अविरत यज्ञ
Ashok Ithape
  • PublishedJanuary 18, 2024

नारायण सेवेची सलग १६ वर्षे !

भुईंज l महेंद्रआबा जाधव :

मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पाच मुलभूत गरजा आहेत. या मध्ये सर्वप्रथम अन्नाचा समावेश केला गेला आहे. अन्नासाठी दाही दिशा; फिरवी आम्हा जगदीशा असे म्हटले आहे ते काही उगाच नाही… आणि म्हणूनच जर भुकेच्या वेळी त्या व्यक्तीच्या पोटात अन्नाचे चार घास गेले तर त्या सारखी सत्कर्माची दुसरी गोष्ट नाही. उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म… या दृष्टिकोनातून आपल्या भारतीय संस्कृती मध्ये भोजनाला यज्ञ कर्माची देखील उपमा दिली आहे.

हेच सत्कर्म निरपेक्ष भावनेतून माहेश्‍वरी चॅरिटेबल फौंडेशन, सातारा या सेवाभावी संस्थेतर्फे क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय म्हणजेच सातारा सिव्हील हॉस्पिटल येथे विविध आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकरिता गेली १६ वर्षे अथकपणे सुरु आहे.

या शासकिय रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणारे रुग्ण हे बर्‍याचदा बाहेर गावाहून येथे दाखल झालेले असतात शिवाय त्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच असते. त्यांच्या देखभाली करीता एखादी व्यक्ती जवळ असावीच लागते. अल्प उत्पन्न असलेल्या, घरापासून दूर व आजारी रुग्णाच्या तब्येतीच्या काळजीत बुडालेल्या नातेवाईकांची आणि रुग्णाची जेवणाची मोठी गैरसोय येथे होत असायची.

माहेश्वरी समाज पुणे- प्रेरणास्थान

अथक अन्नदानाचा पुणे येथे ससून हाॕस्पिटलमध्ये चालणारा उपक्रम हाच साता-यात चालणाऱ्या अन्नदान उपक्रमाचे प्रेरणास्थान आहे. रुग्ण आणि प्रवासात दुर्घटना घडलेले आणि अल्प उत्पन्न असलेले रुग्ण आणि नातेवाईक यांच्यासाठी या गोष्टीची निकड लक्षात घेऊन माहेश्‍वरी चॅरिटेबल फौंडेशन, सातारा संस्थेने अशा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकां करिता सातारा सिव्हील हॉस्पिटल येथे अन्नदान सेवेचा शुभारंभ दि. १८ जानेवारी २००८ रोजी सुरु केला.

सातारा सिव्हील हाॕस्पिटलमध्ये अभावग्रस्त रुग्णांवर केले जाणारे मोफत उपचाराबरोबरच अथक चालणाऱ्या या अन्नदान उपक्रमामुळे रुग्णांबरोबरच सेवा शुश्रुषेसाठी असणाऱ्या नातेवाईकांचीही दुपारच्या जेवणाची फार मोठी सोय आणि आधार झाला. या उपक्रमाचा श्रीगणेशा आयोध्यास्थित स्वामी श्री श्रीधराचार्यजी यांच्या शुभ हस्ते झाला.

अशा उपक्रमासाठी समर्पित भावनेतून सुनियोजितपणे काम करणार्‍या व्यक्तींंची आवश्यकता असते. या उपक्रमाची मुख्य जबाबदारी उपक्रम प्रमुख म्हणून श्री. माधव सारडा यांनी उचलली व त्यांना समर्थपणे साथ देण्याकरीता अध्यक्ष  श्री. प्रकाश मंडोरे, श्री. नरेंद्र मिणियार,  श्री. श्रीराम सारडा, श्री. राधेश्याम भंडारी, श्री. विनोद राठी, श्री. दिलीप लोया, श्री. प्रमोद लाहोटी, श्री. हरीनारायण कासट, श्री. विनोदा लाहोटी, अॕड. श्री.गोकुळ सारडा व माहेश्वरी फौंडेशनच्या सर्व संचालक आणि मित्र परिवार पुढे सरसावला व या अन्नदान सेवा कार्याची सुरुवात झाली.

गेली १६ वर्षे अखंडपणे ताजे व उत्कृष्ट अन्न बनवणारे श्रीनाथ केटरर्सचे श्री मंगलसिंह परमार उर्फ मंगल महाराज यांचे योगदानही वाखाणण्याजोगे आहे. मोठ्या आर्थिक पाठबळा शिवाय हा उपक्रम सुरु ठेवणे अशक्य होते. त्या करीता लोक सहभाग देखील महत्वाचा होता. मग जनसंपर्क सुरु झाला व समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे व्यावसायीक, उद्योजक, व्यापारी, नोकरदार, सामाजिक संस्था यांच्या पर्यंत या उपक्रमाचे महत्व पोहचवून त्याकरिता आर्थिक मदतीचे आवाहन केले गेले.

सजग सातारकरांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावण्यास सुरुवात केली. कोणी वाढदिवसाचे औचित्य साधून तर कोणी मॅरेज अनिर्व्हसरी, एकसष्ठीनिमित्त, पुण्य स्मरण अशा विविध प्रसंगाच्या औचित्याने आपला सहभाग नोंदवू लागले.

परिपूर्ण नियोजन आणि अथक अंमलबजावणी –

या उपक्रमाकरीता केवळ आर्थिक तरतुद करुन चालणारे नव्हते. अनेक गोष्टींच्या नियोजनाची गरज होती. यामध्ये प्रामुख्याने भोजनाचा दर्जा व ते वेळेत रुग्ण आणि नातेवाईंकांपर्यंत पोहचवणे खूप महत्वाचे होते. त्याकरीता परिपूर्ण नियोजन आणि अथक अंमलबजावणी करण्यासाठी संस्थेच्या सर्व क्रियाशील सदस्यांनी ही जबाबदारी  आपल्या व्यावसायीक धावपळीतून वेळात वेळ काढून आजवर निभावली आहे. दररोज दुपारी १२ वाजता अन्नदान सेवा सुरु करण्याची वेळ गेली १६ वर्षे अगदी नियमित पाळली जाते.

अनेकांचे मदतीचे हात.

त्याच बरोबरीने  सर्वांना व्यवस्थित या अन्नदान सेवेचा लाभ मिळतो का ? भोजन घेताना कोणता गोंधळ, गडबड होऊन तिथल्या यंत्रणेवर ताण येणार नाही याची काळजी घेणेही नेहमीच आवश्यक असते. या कामी सातारा पोलीस दल, सिव्हिल हॉस्पिटल सिव्हिल सर्जन, आरएमओ, डाॕक्टर्स, नरूसेस, ब्रदर्स, वैद्यकिय अधिकारी, महिला व पुरुष कर्मचारी वृंद यांची मोलाची साथ असते. महत्वाचे म्हणजे हा उपक्रम सुनियोजित सुरु रहावा याकारीत मा. जिल्हा शल्यचिकित्सक यांचे सहकार्य व बहुमोल मार्गदशन सदैव असते. अभिमानाने सांगावेसे वाटते की करोनाचा काही खडतर कालखंड वगळता हा अन्नदानाचा महायज्ञ आजवर गेली १६ वर्षे अखंड सुरु आहे.

माहेश्‍वरी चॅरिटेबल फौंडेशन, साताराचे अनेक उपक्रम

गेली १६ वर्षे अथक चालवल्या जाणाऱ्या या अन्नदान महायज्ञाबरोबरच अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत माहेश्‍वरी चॅरिटेबल फौंडेशन, सातारा आपले सामाजिक दायित्व पार पाडत आहे. ज्यामध्ये सिव्हील हॉस्पिटल येथे रुग्णांकरीता स्ट्रेचर, वृध्दाश्रमातील वयोवृध्द आजी-आजोबा दत्तक, थंडीच्या दिवसामध्ये बेघर व निराधार अशा गरजू लोकांकरीता रात्रीच्या वेळी फेर फटका मारुन त्यांना मायेची उब देणारे ब्लँकेट् वाटप करणे, रुग्णालयात मोफत आरओ वाॕटर, अंत्य संस्कार विधीसाठी नातेवाईकांची प्रतिक्षा करावी लागते, त्यासाठी मोफत शीत शवपेटीची व्यवस्था केलेली आहे.

अथक उपक्रम – अनेकानेकांचे योगदान

आज १६ वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासातील एका वळणावर थोडंसं मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की ही वाटचाल तशी सोपी मुळीच नव्हती. यात अनेक अडचणी, संकटे आली पण या सर्वांमधून मार्ग निघाला तो केवळ  सामाजिक बांधलकी जपणार्‍या अनेक दानशूर व्यक्ती व ट्रस्टच्या कार्याला समर्थपणे वाहून घेणार्‍या सर्व सदस्यांच्या क्रियाशिल योगदानातूनच…ही अन्नदान सेवा अशी अखंड सुरु ठेवण्याचा माहेश्‍वरी चॅरिटेबल फौंडेशन, सातारा  चा निर्धार नक्कीच आहे. परंतू आवश्यकता आहे ती मदतीच्या आणि दानशूर हजारो हातांची ! शेवटी समाजाला ज्याची गरज असते अशा गोष्टी समाज कोणाच्या तरी माध्यमातून आणि कुणाला तरी प्रेरणा देऊन सुरु करतो; टिकवून ठेवतो आणि वाढवतोही. माहेश्‍वरी चॅरिटेबल फौंडेशन, साताराच्या माध्यमातून सुरु झालेल्या उपक्रमाला अथकपणे चालवण्याचे बळ समाज, अनेकानेक दानशूर आणि सहकार्याच्या हजारो हातांमधून मिळत राहील. देणार्‍याने देत जावे; घेणाऱ्याने घेत जावे ! घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत … या उक्ती प्रमाणे लोक सहभागातून आणि माहेश्‍वरी चॅरिटेबल फौंडेशन, साताराच्या माध्यमातून अथक १६ वर्षे सुरु असलेला अन्नदान महायज्ञ चिरकाल सुरु राहील यात शंकाच नाही.

– डॉ. पी. कुलकर्णी – सातारा

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!