Mon, Mar 2, 2026
शिक्षण स्थानिक बातम्या

वाईमध्ये तालुकास्तरीय ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा’ संपन्न

वाईमध्ये तालुकास्तरीय ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा’ संपन्न
Ashok Ithape
  • PublishedJanuary 16, 2024

वाई : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोश वाचनाची सवय लागावी, विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी मराठी विश्वकोशाचा एक उपयुक्त संदर्भग्रंथ म्हणून अधिकाधिक वापर करावा, तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ‘मराठी विश्वकोशा’चा प्रचार व प्रसार व्हावा, याकरिता मराठी विश्वकोश कार्यालयातर्फे रविवार, दि. १४/०१/२०२४ रोजी मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा आयोजित करण्यात आली.

ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्वविषयसंग्राहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. विविध विषयांचे ज्ञान मराठी भाषेतून प्राप्त करून घेण्यासाठी तसेच प्रमाण मराठी शुद्धलेखनाची ओळख करून घेण्यासाठी ‘मराठी विश्वकोश’ या संदर्भग्रंथाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना ‘मराठी विश्वकोशा’ची ओळख व्हावी म्हणून इयत्ता नववीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ‘मराठी विश्वकोशा’वर आधारित एका धड्याचा समावेश केला आहे. शालेय जीवन पूर्ण केल्यानंतरही विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. अशा विविध स्पर्धा परीक्षांकरिताही ‘मराठी विश्वकोश’ उपयुक्त आहे. याची जाणीव शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांसाठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे जेथे शिक्षणाच्या फारशा सुविधा उपलब्ध नसतात, अशा खेडोपाड्यातील असंख्य विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची एक दिशा मिळत राहील.

गतवर्षी वाई शहरापुरती मर्यादित असणारी ही स्पर्धा या वर्षी प्रथमच वाई तालुकास्तरीय आयोजित करण्यात आली होती. कन्या शाळा, वाई येथे आयोजित केलेली ही स्पर्धा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत वाई तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागांमधील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील इयत्ता नववीच्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेकरिता सहभागी शाळांतील शिक्षकांचे बहुमोल सहकार्य लाभले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विश्वकोश कार्यालयातल्या संपादक वर्गातील प्रीती साळुंके-सकुंडे, पल्लवी गायकवाड, शिल्पा भारस्कर, वर्षा देवरुखकर, आनंद गेडाम यांनी परिश्रम घेतले. परीक्षा पारदर्शी व सुव्यवस्थित पार पाडणेकामी स्नेहा खोब्रागडे, सरोजकुमार मिठारी, रवीन्द्र घोडराज, संतोष गेडाम, सुरेखा मगर, ओंकार भोज यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. तर परिचर वर्ग शंकर शिंदे व विष्णू जाधव यांनी याकामी सहकार्य केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!