ऊसतोड कामगारांच्या झोपड्या आगीत भस्मसात, सह्याद्री कारखान्याकडून मोलाची मदत
मसुर / प्रतिनिधी :
सह्याद्रि साखर कारखाना परिसरातील ऊस तोडणी कामगारांच्या पाच झोपड्यांना अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी यशवंतनगर ता. कराड परिसरात घडली. माजी सहकार व पणन मंत्री आ.बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी तातडीने सर्व प्रकारे मदत पोहोचवली. ऊसतोडणी कामगारांच्या सुमारे १०० ते १५० झोपड्या आहेत. दुपारी दोन वाजता स्वयंपाक चालू असताना त्यातील पाच झोपड्यांना अचानक आग लागली यामध्ये संसारउपयोगी साहित्य कपडे आदी जळून खाक झाले.
सह्याद्री साखर कारखान्याचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी, अध्यक्षा, माई चॅरिटेबल ट्रस्ट सौ.संगिता साळुंखे यांना याबाबतची माहिती सह्याद्रि साखर कारखान्याचे उपशेती अधिकारी श्री.नितीन साळुंखे यांच्याकडून मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली व संसार उपयोगी साहित्य आणि गॅस शेगडीचे वाटप केले.
यावेळी मुख्य शेती अधिकारी वसंतराव चव्हाण, उपशेती अधिकारी नितीन साळुंखे, इरिगेशन संपर्कप्रमुख आर.जी.तांबे, ॲग्रीकल्चर ओव्हरसियर युवराज साबळे व त्यांचा स्टाफ, मनीषा साळुंखे, मीनाताई साळुंखे, देवस्थान कमिटीचे सचिव रामराव साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य कैलास साळुंखे, संजय चव्हाण,माई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव निरंजन साळुंखे, फिल्डमॅन मोरे व तसेच ऊसतोड कामगार व त्यांचे सहकारी उपस्थित होते.













