Tue, Mar 3, 2026
क्रीडा देश विदेश

31 मार्च 2024 पर्यंत देशभरामध्ये खेलो इंडिया योजनेअंतर्गत एक हजार खेलो इंडिया केंद्राची स्थापना करणार

31 मार्च 2024 पर्यंत देशभरामध्ये खेलो इंडिया योजनेअंतर्गत एक हजार खेलो इंडिया केंद्राची स्थापना करणार
Ashok Ithape
  • PublishedJanuary 13, 2024

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री तसेच केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा

नागपूर मध्ये खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचे  केले उद्घाटन

खेळातून  तरुण  पिढीचे व्यक्तित्व होते साकार ;  युवकांच्या सर्वांगीण   विकासाकरीता क्रीडा महोत्सवाच आयोजन- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी

नागपूर 12 जानेवारी 2024

पूर्वी क्रीडा अर्थसंकल्प केवळ  800 कोटी रुपयांचा होता तो केंद्र सरकारने आता जवळपास 3,200 कोटी म्हणजे चार पट केला आहे .येत्या दोन महिन्यात म्हणजेच 31 मार्च 2024 पर्यंत आपण देशभरामध्ये खेलो इंडिया योजनेअंतर्गत एक हजार खेलो इंडिया केंद्राची स्थापना करणार असून या खेलो इंडिया केंद्राच्या संचालनाची जबाबदारी जे  चॅम्पियन ऍथलेट आहेत त्या माजी खेळाडूंना  देण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री तसेच केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नागपूर मध्ये केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचे उद्घाटन नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

देशातील खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलताना अनुराग ठाकूर यांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी देशांमध्ये क्रीडा अनुकूल वातावरण नव्हते परंतु आता एशियन गेम्स मध्ये   पदकांची शतकपूर्ती करून भारताने आपला कीर्तिमान स्थापन केला आहे. मल्लखांब सारख्या महाराष्ट्रातील पारंपारिक खेळांना तसेच देशातील इतर पारंपारिक खेळाच्या खेळाडूंना राष्ट्रीय तसेच खेलो इंडिया गेम्सचा भाग बनवले आहे . या पारंपारिक खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपण नेणार असून या  खेळांना ऑलंपिकमध्ये स्थान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर  विदर्भातील खेळाडूंना सहभागी  करण्यासाठी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सिलेक्टर या ठिकाणी पाठवून येथील स्थानिक प्रतिभा ओळखून त्या खेळाडूंना स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या शिबिरांमध्ये नेण्यात येईल आणि त्यांना  चांगले प्रशिक्षण दिले जाईल असे देखील ठाकूर यांनी स्पष्ट केलं . खेळाडूंना मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून मंच मिळणे, मानसन्मान मिळणे , त्यांना हातभार लावण्यासाठी अर्थसहाय्य मिळणे अश्या  सर्व संधी एकत्रितरित्या खासदार क्रीडा महोत्सवात मिळत असल्याचेही ठाकूर यांनी यावेळी  सांगितले. या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं की गेल्या पाच वर्षापासून या क्रीडा महोत्सवामध्ये भाग घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे यावर्षी जवळपास 65 हजार खेळाडू नागपूरच्या 66  मैदानावर 56 प्रकाराचे खेळ खेळणार आहेत . यामागील एकच उद्देश आहे की   नागपूर क्षेत्रातील   खेळाडू राज्य तसेच देशाच्या स्तरावर जाऊन एक चांगले खेळाडू बनतील आणि त्यांच्या या कार्यातून   देशाचा अभिमान वाढेल.  नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नागपूरच्या क्रीडा मैदानाच्या विकासासाठी 200 कोटी रुपये दिले असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान दोन स्विमिंग टॅंक बनतील असा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितलं . खेळातून  तरुण  पिढीचे व्यक्तित्व साकार होते त्याचप्रमाणे खेळाडू वृत्ती सुद्धा वृद्धिंगत होते त्यामुळे आपल्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितलं.

या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. या विमापत्राचे ही प्रातिनिधिक वितरण  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजक, पदाधिकारी ,स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध शाळातील विद्यार्थी, क्रीडा संघाचे प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!