कु .साव्या पिसाळ हीचा वाढदिवस अनाथ आश्रमाला अन्नदान करून साजरा
बावधन l प्रतिनिधी
बावधन हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक शहाजी धर्माजी पिसाळ यांची नात साव्या संग्राम पिसाळ हीचा 10 जानेवारी हा वाढदिवस वेळे तालुका वाई येथील यशोधन अनाथ आश्रम या संस्थेतील मनोरुग्णांना अन्नदान करून साजरा करण्यात आला. निवृत्त शिक्षक शहाजी पिसाळ हे आपल्या कुटुंबातील वाढदिवस सामाजिक भावनेतून मदतीचा हात पुढे करून साजरा करतात यावेळी त्यांनी आपली अमेरिकेत राहणारी नात साव्या हीचा वाढदिवस यशोधन अनाथ आश्रमातील मनोरुग्णांना गोड जेवण देऊन केक कापून साजरा केला, यातून समाजाला आदर्श संदेश दिला.
वेळे येथे यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अनाथ आश्रम चालवला जातो या आश्रमात मनोरुग्णांचा मोफत सांभाळ केला जातो. आश्रमात 35 पुरुष व 28 महिला मनोरुग्णांची मोफत सेवा केली जाते माणुसकी हा एकच धर्म या भावनेतून रुग्णांची देखभाल सांभाळ औषध उपचार अहोरात्र न थकता केले जातात. ही संस्था वाई येथील सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांनी 2005 ला सुरू केली आहे.
वेळे ते सोळशी रोडवर ही संस्था आहे अनेक वेळा घरगुती अडचणी मुळे, कलहामुळे, नातेवाईकांनी घराबाहेर काढल्यामुळे, आजारपणामुळे किंवा मानसिक संतुलन बिघडल्यामुळे अनाथ बेघर वयोवृद्ध लोक रस्त्यावर येतात त्यांची कोठेही राहण्याची सोय नसते उपाशी राहतात अशा अनाथ लोकांसाठी यशोधन अनाथ आश्रमात सहारा दिला जातो.
यशोधन संस्थेचे काम अध्यक्ष रवी बोडके, व्यवस्थापक दीपक कांबळे, संतोष लोकरे, सुरेखा ढमाळ, लता ढमाळ, हे मनोभावे अनाथांची सेवा करतात अशा अनाथांची निवड शहाजी पिसाळ सरांनी करून आदर्श पायंडा पाडला आहे.
यावेळी माजी सरपंच पप्पू राजे भोसले, ज्येष्ठ पत्रकार दिलीप कांबळे, माजी उपसरपंच कुंडलिक सावंत, शहाजी पिसाळ, रोशन पुजारी, ज्ञानेश्वर राजपुरी, सुरेखा शहाजी पिसाळ, सुप्रिया दिग्विजय पिसाळ, आदी उपस्थित होते.













