Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

भुईंजमध्ये चार महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्याच्या चिंधड्या उडाल्या, दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या स्वच्छतागृहाचा स्लॅब ढासळला

भुईंजमध्ये चार महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्याच्या चिंधड्या उडाल्या, दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या स्वच्छतागृहाचा स्लॅब ढासळला
Ashok Ithape
  • PublishedJanuary 10, 2024

ग्रामस्थांमधून नाराजी : खड्डयात वृक्षारोपण करुन नोंदवला निषेध

भुईंंज, १० जानेवारी : अवघ्या 4 महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्याच्या एकाच अवकाळी पावसात उडलेल्या चिंधड्या आणि अवघ्या 2 वर्षांपूर्वी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाचा कोसळलेला स्लॅब या घटनांनी भुईंजमधील सार्वजनिक कामांचे वाभाडे निघाले आहेत. जनतेच्या पैशातून होणार्या कामांच्या दर्जाबाबत संबंधितांना काडीचेही घेणेदेणे नसून या नुकसानीची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, भुईंज बसस्थानक परिसरातील नव्या रस्त्याला एकाच किरकोळ पावसात पडलेल्या खड्ड्यात नागरिकांनी वृक्षारोपण करुन निषेध नोंदवला.

याबाबत अधिक माहिती अशी, की भुईंज येथे तलाठी कार्यालयासमोर सुमारे 2 वर्षांपूर्वी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. अवघ्या 2 वर्षांपूर्वी बांधलेल्या या स्वच्छतागृहाचा स्लॅबच काही दिवसांपूर्वी कोसळला. यापूर्वीही चाहूर येथील अंगणवाडी इमारत बांधकामानंतर काही वर्षातच ढासळली होती. तब्बल 9 ते 10 वर्षां नंतर त्या ठिकाणी आता नवी इमारत मंजूर झाली असून त्यावरुन श्रेयवाद सुरु आहे.

एकीकडे श्रेयवादासाठी आवाज उठवला जात असताना दुसरीकडे मात्र निकृष्ट बांधकामाला जबाबदार कोण याबाबत संबंधित गंभीर नसल्याचे दिसून येते. आता तर अवघ्या दोन वर्षांत बांधलेल्या स्वच्छतागृहाचा स्लॅब कोसळल्याने भुईंजमधील सार्वजनिक कामाबाबात किती निष्काळजीपणा दाखवला जात आहे तेच दिसून आले आहे. स्लॅब कोसळल्यानंतर संबंधित ठेेकेदाराने तातडीने येवून त्याची दुरुस्ती केली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या या कामाची लक्तरे निघाली आहेत. त्या अर्थाने स्वच्छ भारत अभियान भुईंजमध्ये ढासळले असून ठेकेदाराने त्यावर काटकीने मलम लावण्याचा उद्योग केला आहे.

त्यासोबतच भुईंज बसस्थानक आवारात अवघ्या काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र नुकत्याच झालेल्या किरकोळ अवकाळी पावसात याच ठिकाणी खड्डे होवून त्यामध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. नव्या कोऱ्या डांबरीकरणाची वाट लागून त्यात डबकी झाल्याने या कामाच्या दर्जाची लक्तरे गावाच्या नाक्यावर टांगली गेली आहेत.

वास्तविक ते काम होतानाच संबंधित ठेकेदाराला जागरुक नागरिकांनी दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करुन सूचना केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचेच आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव व प्रतापसिंह इथापे यांनी नव्या कोऱ्या रस्त्याच्या कामातील पाणी साचलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करुन अभिनव पद्धतीने या भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे.

दरम्यान, भुईंजमध्ये जनतेच्या पैशाने होणाऱ्या कामांची अशी लक्तरे निघत असून त्यातून जनतेच्या पैशावर वारंवार दरोडा घातला जात असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. याबाबत जबाबदार व्यक्ति चुकीच्या गोष्टी व व्यक्तिंनाच पाठीशी घालण्यात मश्गूल असल्याने येथील अशा विविध घोटाळ्यांबात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनीच लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
. . . . . . . . . . . . . .  . . . . . . . . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . . .

अवघ्या चार महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यावर एकाच पावसाने खड्डे पडून पाणी साचल्याने त्या खड्यात वृक्षारोपन करुन निषेध  विनोद जाधव व प्रतापसिंह इथापे यांनी निषेध नोंदवला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!