ज्ञानोबा – तुकोबांच्या मूर्तींची देगावमध्ये स्थापना – श्री. रामदास इथापे यांनी मंदिरास दिली मूर्तीची भेट
वाई / प्रतिनिधी :
देगाव (ता. वाई) येथे मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. गावचे सुपुत्र व किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. रामदास इथापे यांनी मूर्ती मंदिरास भेट दिली आहे. श्री. इथापे यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकी व धार्मिक वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून आयोजित मूर्तीची स्थापना सोहळ्यानिमित्त देगावमधील वातावरण मोठे चैतन्यमय झाले होते. मूर्तींचे गावामध्ये आगमन झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळाच्या सहभागातून टाळ- मृदंगाच्या गजरात व ‘राम कृष्ण हरी’ च्या नाममंत्र उच्चाराने या सोहळ्यास प्रारंभ झाला. तसेच हलगी ग्रुप किकली यांच्या कलाकारांनी केलेल्या झांज – हलगीच्या कडकडाटासह निनादाने वातावरण भारावून गेले होते. देवनामाच्या जयघोषात हातात भगव्या पताका घेऊन महिला, मुली, माहेरवासीनी व अबालवृद्धांच्या सहभागातून श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना बुधवार, दि. 3 जानेवारी 2024 रोजी श्री श्रीकांत कुलकर्णी (काका) यांच्या हस्ते करण्यात आली.
‘श्रीं’ ची मूर्ती श्री. रामदास महादेव इथापे यांच्या सौजन्याने भेट देण्यात आल्याने त्यांच्याप्रतीही ग्रामस्थ मंडळींकडून कृतज्ञता व्यक्त होत आहे.
दि. 3 जानेवारी रोजी सकाळी संकल्प, गणेश पूजन, पुण्यवाचन, प्रधानपीठ स्थापन, होम हवन, मूर्तीस जलाभिषेक, निद्रावास, भजन, प्राण प्रतिष्ठापना व सामुदायिक महाआरती झाली. त्यानंतर श्री वसंत गणपती सूर्यवंशी व श्री. भीमराव नारायण चव्हाण यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली. रात्री श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ यांच्या वतीने जागराचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने देगाव गावात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्ताने देगाव गावातील सर्व अबालवृद्ध माता बंधू भगिनी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला. मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त सुश्राव्य संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास देगाव गावातील व पंचक्रोशीतील वारकरी, लहान-थोर, बंधू-भगिनी, माहेरवाशीण, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













