स्त्रियांचे कर्तृत्व सावित्रीबाईंच्या प्रयत्नाचे यश : प्रा. शेखर फरांदे
![]()
भुईंज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
भुईंज : क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांनी अनंत यातना सोसून स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले. फुले दाम्पत्याच्या त्या प्रयत्नाला आलेले यश म्हणजे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया दाखवत असलेली कर्तबगारी होय, असे प्रतिपादन प्रा. शेखर फरांदे यांनी भुईंज येथे केले.
भुईंज येथील दिन बंधू मित्र मंडळाच्या वतीने फुलेनगर येथे आयोजित केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात प्रा. फरांदे बोलत होते.
ते म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना प्रोत्साहन दिले, अफाट धैर्य दिले. त्या बळावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी धर्ममार्तंडानी प्रचंड विरोध, हल्ले करूनही स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. तो प्रकाश आजही दिशा देत असून फुले दाम्पत्याचे सर्व समाजासाठी असणारे ऋण विसरता कामा नये.
अध्यक्ष सुनिल शेवते यांनी स्वागत केले, दत्तात्रय शेवते यांनी सूत्रसंचालन केले, विलास शेवते यांनी आभार मानले.
कार्यक्रमास किसन वीर कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे, महालक्ष्मी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. संजीवनी दळवी, सुधीर भोसले पाटील, सरपंच विजय वेळे, उपसरपंच शुभम पवार, जेष्ठ पत्रकार जयवंत पिसाळ, माजी उपसरपंच शशिकांत दगडे, प्रशांत जाधवराव, ग्रा. पं. सदस्य ईशान भोसले, नारायण नलावडे, अमित लोखंडे, सौ. दिपाली भोसले, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह जगन्नाथ दगडे, वाई तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर रोकडे, दिन बंधू मित्र मंडळ, भुईंज प्रेस क्लब, विविध पक्षांचे, संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी संयोजकांचे कौतुक केले.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सर्व समाजातील कष्टकरी, शेतकरी, वंचित आणि महिलांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचले. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून शिवविचारांची चेतना निर्माण करणाऱ्या महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. या कार्याचे कायम स्मरण ठेऊन महिला, शेतकरी, वंचतांप्रति कायम आदर बाळगा, असे आवाहन प्रा. फरांदे यांनी करून फुले दाम्पत्याचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान करावा अशी मागणी केली













