Tue, Mar 3, 2026
सामाजिक

राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा ग्राहकहिताच्या कायद्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा – अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे

राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा ग्राहकहिताच्या कायद्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा – अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे
Ashok Ithape
  • PublishedDecember 28, 2023

सातारा दि. २६ :  ग्राहकांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक कायदे केले असून त्यांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा भारती सोळवंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत सदस्य विजय सागर, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य सुनिता राजेघाटगे आदी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये केंद्र शासनाने अनेक सुधारणा केल्या असून ग्राहकांना व्यापक अधिकार प्राप्त झाले आहेत. ग्राहकांमध्ये आपले हक्क आणि अधिकारांची जाणिव होण्यासाठी ग्राहक दिनापुरता कार्यक्रम मर्यादित न करता निरंतर त्याविषयी काम झाले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा ग्राहक मंचाच्या अध्यक्षा श्रीमती सोळवंडे म्हणाल्या, ई-कॉमर्स आणि डिजीटल व्यापाराच्या युगात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. कुणाचीही फसवणूक झाल्यास तात्काळ ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार करावी. डिजीटल व्यवहाराबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी मंचातर्फे सहकार्य केले जाईल.

ग्राहक या संकल्पनेची व्याप्ती मोठी असून प्रत्येक नागरिक ग्राहक आहे. कोणतीही वस्तू, सेवा खरेदी केल्यानंतर पावती घ्यावी. ग्राहकांना त्यांचे अधिकार व कायद्याची माहिती व्हावी हा या कार्यक्रम साजरा करण्यामागील उद्देश असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी सांगितले.

प्रारंभी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडीच्या विद्यार्थ्यांनी डिजीटल व्यापाराच्या युगात ग्राहकांचे सरंक्षण या विषयी पथनाट्य सादर केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!