सुरभी भोसले चव्हाण यांच्या प्रयत्नातून चिमुरड्यांच्या चेहर्यावर फुलणार हसू
![]()
9 वर्ष रखडलेला वरचे चाहूर येथील अंगणवाडीचा प्रश्न मार्गी
पाचवड (प्रतिनिधी) :
वरचे चाहूर (भुईंज ) येथील 9 वर्षांपूर्वी ढासळलेल्या अंगणवाडीसाठी निधी उपलब्ध करण्यात भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सुरभी भोसले चव्हाण यांना यश आले आहे. या अंगणवाडीसाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 11 लाख 25 हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. यासाठीच्या त्यांनी केलेल्या प्रयत्नातून आता नव्याने साकारणार्या अंगणवाडीच्या इमारतीमुळे चिमुरड्यांच्या चेहर्यावर हसू फुलणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून वरचे चाहूर (भुईंज), ता. वाई येथे सुमारे 19 वर्षांपूर्वी मध्ये उभारण्यात आलेली अंगणवाडीची इमारत पुढे अवघ्या नऊ ते दहाच वर्षात ढासळली. तेव्हापासून चाहूर ग्रामस्थ या ठिकाणी नवी इमारत उभारण्याची मागणी घेवून वणवण भटकत होते. या ढासळलेल्या इमारतीत साप आणि कुत्र्या, मांजरांचा निवारा निर्माण झाल्याने अंगणवाडी खासगी इमारतीत भरवली जात असून त्याचे भाडे अदा करावे लागते.
गेली 9 वर्ष चाहूर ग्रामस्थ या ठिकाणी नवी खोली बांधून मिळावी यासाठी अर्ज विनंत्या करत आहेत. गट शिक्षण अधिकार्यांनीही मागे इथे येवून पाहणी केली. त्यांच्याकडे नवी खोली बांधावी अशी मागणी येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी व ग्रामस्थांनीही वेळोवेळी केली. या बाबबत वृत्तपत्रात आवाज उठवल्यानंतर सौ. सुरभी भोसले चव्हाण यांनी या घटनेची दखल घेत या ठिकाणी नवी इमारत बांधून मिळावी यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश येवून जिल्हा वार्षिक योजना निधीतून 11 लाख 25 हजारांचा निधी उपलब्ध झाला आहे. याबद्दल सौ. सुरभी भोसले चव्हाण यांना ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत.













