कित्येक दिवसांनी आम्ही सिनेमागृहात सिनेमा पहिला (आम्ही खरेतर नाटक प्रेमी ) पण २ तास १० मिनिटे मनमुराद हसून थिएटरच्या बाहेर पडलो. त्यात हा खास सिनेमा होता कारण प्रसाद दादाचे पहिले दिग्दर्शन असलेला मल्टी स्टारर सिनेमा आहे : प्रमोद चिंचवडकर,
तीन भाऊ आणि त्याचे कुटुंब नेहमीच अपयशाचा सामना करत असतात आणि अचानक वाडवडिलांनी राखून ठेवलेल्या जमिनीचे पैसे मिळतात. त्यासोबत वाडा देखील आणि याच वाड्याचे हॉटेलमध्ये रूपांतर करावे असे श्रावण (गिरीश कुलकर्णी) या मोठ्या भावाच्या डोक्यात कीडा वळवळ करतो. ठरते मग हॉटेल सुरु करायचे आणि ते सुरु देखील होते.
यानंतर या हॉटेलमध्ये सुरु होते एकामागोमाग एक मृत्यूचे तांडव त्याला हे कुटुंब कसे सामोरे जाते त्यात काय गंमत घडते यातून त्यांची सुटका होते का ? याची कथा म्हणजे ” एकदा येऊन तर बघा ”. हॉटेलमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचा मृत्यू हाच कथेचा मुख्य गाभा असल्याने त्या मृत्यूच्या घटना अनेकदा घडतात. जेव्हा सिनेमात एखादी घटना सतत घडत जाते तेव्हा ते एका पॉइंटला रटाळ वाटू शकते पण ते तसे होणार नाही याची काळजी दिग्दर्शकाने घेतलेली आहे.
या सर्व घटना इतक्या वेगाने घडतात कि कुठेही तुम्हाला तुमचे डोके चालवायची संधी मिळत नाही. मृत्यू हि खरेतर गंभीर बाब त्या मृत्यूवर विनोद निर्माण करताना कुठेही मरणाची थट्टा होत नाही हे विशेष. सर्वांची काम उत्तम झाली आहे. प्रसाद दादाने बॅकफूटवर राहून इतरांना संधी दिलेली दिसते. ओंकारने त्याला मिळालेले संवाद वाजवले आहे तर नम्रताने देखील छान भूमिका केली आहे. गिरीश कुलकर्णी याना याआधी खूप वेगळ्या भूमिकांमध्ये पहिले आहे पण श्रावण म्हणून पाहताना मजा आली.
राजू शिसतकर, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित , रोहित माने , वनिता खरात , विशाखा सुभेदार , पॅडी दादा, सुशील दादा यांनी त्यांच्या वाट्याला आलेला सिन चोपला आहे. संवाद एकदम खुसखुशीत झाले आहे. कॅमेरा वर्क अजून उत्तम हवे होते असे राहून राहून वाटले कारण गगनबावडा येथील रम्य ठिकाणी शूटिंग झाल्याने खूपच जास्त वाव होता. सिनेमातली गाणी त्याचे संगीत आणि गीत लेखन जमून आले आहे.
नेहमी आपण प्रसाद दादा आणि सिनेमातील टीमला हास्यजत्रामध्ये पाहत आलो आहे पण हा सिनेमा कुठेही हास्यजत्रेची आठवण करून देत नाही हे प्रसाद दादा आणि टीमचे कौतुक आहे. प्रसाद दादा जेवढा गुणी कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक आहे तितकाच तो चांगला मित्र आहे. हर्ष हॉलीडेजसोबत तो अनेकदा स्वतः सहलीला गेला आहेच पण इंडस्ट्रीमधील अनेकांना आपले नाव देखील सुचवले. मित्रांना सोबत घेऊन जायची वृत्ती सिनेमातही आपल्याला दिसून येते. हिंदीच्या बिगबजेट मध्ये सिनेमाला स्क्रीन न मिळण्याचा मुद्दा विधानभवन पर्यंत गाजला तरीही अजून अपेक्षित प्राईम टाइम आणि थिएटर मिळालेले नाहीत तेव्हा प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी अधिक वाढते आहे कि थिएटर मालकांनी स्वतःहून या सिनेमाचे शो वाढवायला हवे ….
एकदा ” नक्की ” येऊन बघा असाच हा सिनेमा तुम्ही कधी पाहायला जात आहात…













